Nigdi News: शिवसृष्टी उभारा; भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समितीची पालकमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज –  निगडी भक्ती – शक्ती स्मारकालगत प्राधिकरण (Nigdi News) येथील पेठ 24  (नंबर 12 , 13 व 14) या मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित शिवसृष्टी उभारण्यात यावी. तेथील काही जागा सर्व समाजाच्या कार्यक्रमासाठी मोकळी  ठेवण्याची मागणी भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समितीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडे, शहराध्यक्षांकडे केली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, भाजपचे शंकर जगताप यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, पिंपरी- चिंचवड शहराच्या प्रवेशद्वारावर महापालिकेने भक्ती- शक्ती समूह शिल्प उभारले आहे. हे शिल्प शहराचे वैभव आहे. या शिल्पाच्या समोर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

या भक्ती-शक्ती शिल्प समूहाच्या शेजारील जागेत छत्रपती शिवाजी महाराज व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम होत होता. मात्र, निगडी उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा पीएमपीएल डेपो शेजारी स्थलांतरित करण्यात आला.

Pune Railway : पुणे रेल्वेने मार्च महिन्यात 21 हजारहून अधिक विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना ठोठावला कोटीं रुपयांचा दंड

भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सन 2017 पासून महापालिकेच्या सहकार्याने (Nigdi News) भव्य दिव्य शिवजयंती उत्सव या समूह शिल्पालगतच्या पेठ क्र.24 सर्वे नं.12, 13, 14 या सुमारे साडेतीन ते चार एकर जागेत सुरू करण्यात आला. या जागेत मोठमोठे खड्डे व राडारोडाने अत्यंत ही जागा दुरावस्थेत होती. शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी सन 2017 पासून महापालिकेने दरवर्षी लाखो रुपये खर्च करून ही जागा उपलब्ध करून दिली.

शिवजयंती उत्सव संपल्यानंतर या जागेत मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात येत होता. महापालिका प्रशासन शिवजयंतीसाठी जेसीपी,पोकलेन, डंपर, कर्मचारी लावून या जागेची सपाटीकरण करून उत्सवासाठी ही जागा उपलब्ध करून देत होती.

या कार्यक्रमाचे आणि जागेचे वैभव पाहून शहरातील काही राजकीय लोक व बांधकाम व्यवसायिकांचे डोळे फिरले. त्यांनी पीएमआरडीए प्रशासनाला मॅनेज करून बिल्डरांबरोबर हात मिळवणी करून पीएमआरडीए प्रशासनाने तातडीने या जागेचा लिलाव जाहीर केला.  ही जागा बिल्डरांच्या घशात घातली. निगडी गावठाणच्या लोकांना गाव जत्रा उत्सवात (कुस्त्यांचा आखाडा तमाशा व इतर कार्यक्रम) यासाठी ही जागा खूप महत्त्वाची आहे.

त्यामुळे हे लिलाव प्रक्रिया संपूर्ण रद्द करून संबंधित बिल्डरांनी सुरू केलेले बेकायदेशीर काम थांबवण्यात यावे. या जागेत महापालिकेने अथवा पीएमआरडीएने शिवसृष्टी व इतर प्रकल्प विकसित करावेत अशी मागणी केल्याचे मारुती भापकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.