Pimpri : पंढरीच्या विठोबावर वारक-यांचा जास्त अधिकार – चैतन्य महाराज देगलूरकर

एमपीसी न्यूज – वारकरी संप्रदायातील नसणा-यांचाही आणि अनेक मराठी-कानडी लोकांचे कुलदैवत हे विठोबा आहे. पंढरीचा विठोबा हा सर्वांचाच आहे. असे असले, तरी त्यावर वारक-यांचा जास्तीत-जास्त अधिकार आहे, असे मत प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराज देगलूरकर यांनी व्यक्त केले. 

अखिल भारतीय वारकरी महामंडळ आणि पिंपळे सौदागर ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार आणि प्रवचनकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पंढरपूर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, संत एकनाथ महाराजांचे वंशज योगिराज महाराज गोसावी, प्रमोद महाराज जगताप, चंद्रकांत महाराज वांजळे, पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, प्रकाश महाराज जवंजाळ, उमेश महाराज देशमुख, सतीश महाराज काळजे, संतदास महाराज मनसुख, संयोजक शेखर कुटे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नगरसेवक नाना काटे, शत्रुघ्न काटे  निर्मला कुटे, रंगनाथ फुगे, बाबासाहेब तापकीर, रामभाऊ बराटे आदी उपस्थित होते.  

देगलूकर महाराज म्हणाले, समितीवर काम करणे अवघड किंवा अशक्य नाही. त्यासाठी समितीवर काम करण्याची आवड असणा-या व्यक्तीस संधी दिल्यास चांगले काम होईल. विठोबा केवळ वारक-यांचा असा अभिनिवेश बाळगणे चुकीचे आहे. महाराष्ट्रातील असे अनेक लोक आहेत, की त्यांचे कुलदैवत विठोबा आहे. मराठी आणि कानडी असे अनेक लोक आहेत, ते विठोबाला मानतात. त्यामुळे विठोबा हा सर्वांचाच देव आहे. कारण त्याकडे सर्वांचाच ओढा आहे. त्यामुळे पंढरपूर अधिक स्वच्छ चांगले कसे राहील यासाठी काम करण्याची गरज आहे. पंढरीत काय सेवा असाव्यात-नसाव्यात यावर चर्चा होणे गरजेचे आहे. पंढरीचा वारकरी हा सेवाभावी वृत्ती जोपासणारा आहे. त्यामुळे देवस्थान किंवा समितीनेही वारकरी हित पाहण्याची गरज आहे. 

लहवितकरमहाराज म्हणाले, पंढरपूर देवस्थानाच्या सहअध्यक्षांनाही राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळायला हवा. पंढरपूरच्या मूलभूत प्रश्नांबाबत वारकरी महामंडळाने लढा दिला होता. त्यामुळे विठ्ठलाची काही लोकांच्या जोखडातून मुक्तता झाली होती. पंढरपूर हे वारक-यांचे आहे. तिथे वारकरी नेतृत्वच असावे. पंढरीची वारी वाढते आहे. तिथे सुविधाही मोठ्या प्रमाणावर मिळण्याची गरज आहे. समिती ही वारक-यांची असावी राजकीय नसावी. औसेकर महाराजांसारख्या व्यक्तींना या समितीवर संधी मिळण्याची गरज आहे. 

नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. तर, शेखर कुटे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.