Pimpri : फेरीवाल्यांनी बायोमेट्रीक नोंदणी करण्याचे पालिकेचे आवाहन 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील पात्र फेरीवाल्यांची 17 ते 29 सप्टेंबर 2018 दरम्यान नोंदणी करण्यात येणार आहे. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आठही क्षेत्रीय कार्यालयामध्ये नोंदणी केली जाणार असून पात्र फेरीवाल्यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयात आवश्यक कागदपत्रे आणि आधारकार्डच्या पुराव्यासह कार्यालयात जाऊन बायोमेट्रीक नोंदणी करण्याचे आवाहन, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. 

महापालिकेतर्फे सन 2012 ते 2014 मध्ये फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये पात्र फेरीवाल्यांची बायोमेट्रीक नोंदणी करुन प्रमाणपत्र देण्यात आले होते. तथापि, या सर्वेक्षणात पात्र फेरीवाल्यांची बायोमेट्रीक नोंदणी पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे पात्र असलेल्या फेरीवाल्यांसाठी महापालिकेतर्फे 17 ते 29 सप्टेंबर 2018 दरम्यान आठही क्षेत्रीय कार्यालयामध्ये नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे.

पात्र फेरीवाल्यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी पावणेसहा यावेळेत आवश्यक कागदपत्रे आणि आधारकार्डच्या पुराव्यासह जाऊन बायोमेट्रीक नोंदणी करावी. या कालावधीत नोंदणी करुन न घेणा-या फेरीवाल्यांची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.