PCMC: नालेसफाईचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा – आयुक्त शेखर सिंह

एमपीसी न्यूज – पावसाच्या पाण्याचा निचरा प्रभावीपणे होण्यासाठी (PCMC)शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या नाल्यांची साफसफाई करण्याचे काम युद्धपातळीवर पुर्ण करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच पुरपरिस्थिती सहजतेने हाताळण्यासाठी सर्व विभागांनी अंतर्गत समन्वय ठेवावा, असे निर्देशही आयुक्त सिंह यांनी दिले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने शहरात पावसामुळे(PCMC) उद्भवणाऱ्या प्रश्नांचे पूर्व नियोजन करण्यात येत आहे. आरोग्य विभागामार्फत शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत येणाऱ्या एकूण 144 नाल्यांची साफसफाई करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच पावसाळ्याच्या अनुषंगाने महानगरपालिका हद्दीत पुरपरिस्थितीत उद्भवू नये तसेच सखल भागात पाणी साचू नये यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त शेखर सिंह यांनी पुर्वनियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

8 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण 144नाले

अ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत  25 नाले, ब क्षेत्रीय कार्यालयातंर्गत 15 नाले, क क्षेत्रीय कार्यालयातंर्गत २९ नाले, ड क्षेत्रीय कार्यालयातंर्गत 12 नाले तसेच इ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत 16 नाले, फ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत 18 नाले, ग क्षेत्रीय कार्यालयातंर्गत 9 नाले तर ह क्षेत्रीय कार्यालयातंर्गत 20 नाले असे एकूण 144  नाले महापालिका हद्दीमध्ये आहेत.

नाले साफसफाईच्या कामात दिरंगाई आढळ्यास होणार कारवाई

ज्या नाल्यांमध्ये साफसफाई करताना अडचणी येत आहेत त्या नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. आयुक्त शेखर सिंह यांच्या वतीने दररोज होणाऱ्या नाले सफसफाईच्या कामाचा आढावा घेतला जात असून नालेसफाईच्या कामामध्ये दिरंगाई आढळल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देशही आयुक्त सिंह यांनी दिले आहेत.

जेसीबी, पोकलेन व स्पायडर मशिनच्या सहाय्याने नालेसफाई

पावसाळ्यात नालेसफाई संदर्भात कामे करण्यास अडथळा निर्माण होतो, त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापुर्वी नालेसफाईचे काम महापालिकेच्या वतीने पुर्ण करण्यात येणार आहे. नालेसफाई करताना आवश्यक ठिकाणी जेसीबी, पोकलेन व स्पायडर मशिनने नालेसफाई करण्यात येत आहे, तसेच अरुंद नाल्यांच्या ठिकाणी सुरक्षा साधने वापरूनच नालेसफाई केली जात आहे. शहरातील विविध भागात बुजविलेले नाले, नाल्यावर किंवा नाल्यामध्ये केलेले अतिक्रमण तसेच नाल्याची रुंदी कमी केलेली आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.