PCMC : रद्दीतून मिळाले कागदांचे 12 रिम मोफत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात शून्य कचरा उपक्रम 1 मे पासून राबविण्यात येत आहे. त्या (PCMC) अंतर्गत विविध कार्यालयातील रद्दी कागद कचर्‍यात न टाकता ते जमा केले जातात. त्या बदल्यात महापालिकेस प्रिन्टसाठी ए फोर आकाराचे पांढर्‍या कागदाचे एकूण 12 रिम (गठ्ठे) मोफत मिळाले आहेत.

या उपक्रमास अधिकारी व कर्मचार्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, त्याची व्याप्ती हळूहळू वाढत आहे. महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयात सर्वात प्रथम शून्य कचरा उपक्रम राबविण्यात सुरुवात झाली. त्यात प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबविला गेला. प्लास्टिकची पिशवी आणण्यास मनाई करण्यात आली.

कागदी प्लेट व ग्लासेसचा वापरही बंद करण्यात आला. अधिकारी व कर्मचारी स्टील किंवा काचेची बाटली व ग्लासचा वापर करतात. वापरलेले व वाया गेलेले कागद फेकून न देता ते एका बाजूस गोळा करून ठेवले जाते. जमा झालेली रद्दी कागद स्कॅपमन प्रा. लि. ही एजन्सी घेऊन जाते. महापालिकेतील विविध विभागांतील 13 मे ते 30 जून या कालावधीतील जमा झालेले रद्दी कागद व पुठ्ठे एजन्सीद्वारे गोळा करण्यात आला.

Khed : अज्ञात वाहनचा धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

जमा झालेल्या रद्दीचे वजन 1 हजार 8 किलो इतके झाले. त्या रद्दी कागदाचा पुनर्वापर केला जातो. त्याबदल्यात संबंधित (PCMC)  एजन्सीने ए फोर आकाराचे पांढर्‍या कागदाचे एकूण 12 रिम महापालिकेस दिले आहेत. हा उपक्रम कायम ठेवला जाणार असून, रद्दी व भंगार साहित्य फेकून न देता तो संबंधित एजन्सीला दिल्याने महापालिकेचा फायदा होत आहे.

तसेच, नाहक कचरा निर्माण होण्यास अटकाव होत आहे. स्वच्छतेसाठी सर्व विभागात हिरवा व निळ्या रंगाचे डस्टबिन ठेवण्यात आले आहेत.

याबाबत महापालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे म्हणाले, मुख्यालयात शून्य कचरा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याला अधिकारी व कर्मचार्‍यांचा प्रतिसाद मिळत आहे. वाया गेलेले कागद चुरगाळून डस्टबिनमध्ये फेकून न देता ते एका बाजूला गोळा करून ठेवले जात आहेत.

संबंधित एजन्सीचा माणूस येऊन ती रद्दी घेऊन जातो. त्यातून पालिकेस प्रिन्टसाठी ए फोर आकाराचे पांढर्‍या कागदाचे 12 रिम मोफत मिळाले आहेत. त्या रिमची किमत दोन ते अडीच हजार इतकी असली तरी, टाकाऊ साहित्य व रद्दीतून नवनिर्मितीचा आनंद वेगळाच आहे. शून्य कचरा उपक्रम सर्व 8 क्षेत्रीय कार्यालय व इतर ठिकाणीही टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.