PCMC : यांत्रिक पद्धतीने साफसफाई करारनाम्याची खासगी संस्थेकडून तपासणी

एमपीसी न्यूज  – यांत्रिकी पध्दतीने रस्ते साफसफाई कामाची निविदा (PCMC) महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून राबविली जात आहे. ठेकेदारांसोबत केला जाणारा करारनामा महापालिका कायदा विभागाकडून तपासून घेतला जातो. मात्र, कायदा विभागाने करारनामा तपासून दिल्यानंतर देखील पुन्हा लाखो रुपये खर्चून एका खासगी संस्थेकडून तो तपासून घेण्यात येत आहे.

शहरातील 18 मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्यात येणार आहे. या निविदेस प्रशासकीय राजवटीत आयुक्त शेखर सिंह यांनी 27 डिसेंबर 2022 ला स्थायी समितीची मान्यता दिली. चार विभागातील या कामासाठी सात वर्षांसाठी 328 कोटी 95 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. साडेतीन महिने उलटून अद्याप हे काम सुरू झालेले नाही.

Pune : गुंतवणुकीच्या आमिषाने सुमारे तीन कोटींचा गंडा घालणारे गजाआड

या सात वर्षांच्या कामासाठी चार ठेकेदारांसोबत करण्यात आलेला करारनामा पालिकेच्या कायदा विभागाने तपासून दिला. परंतु, कामकाजाची व्याप्ती मोठी असून त्रयस्थ खासगी कायदे तज्ज्ञामार्फत करारनामा तपासण्याचा निर्णय आयुक्त सिंह यांनी मंगळवारी घेतलेल्या स्थायी समितीत घेतला. त्यानुसार पालिकेने तीन संस्थांकडून प्रस्ताव मागितले होते. त्यापैकी लिंक लीगल संस्थेमार्फत करारनामा तपासून घेण्यास त्यांनी मान्यता दिली आहे. त्यासाठी संस्थेला एका फेरीसाठी 2 लाख रुपये तपासणी शुल्क दिले जाणार आहे. त्यानंतर आवश्‍यकता असल्यास प्रति तास 9 हजार रुपये इतके शुल्क अदा केले जाणार आहे.

करारनाम्यासाठी कायदेशीर तपासणी करून घेणे योग्यच आहे. मात्र, पालिकेचा स्वतःचा स्वतंत्र कायदा विभाग असून या विभागावर दरमहा लाखो रूपये खर्च करण्यात येत आहेत. असे असताना करारनामा खासगी संस्थेकडून तपासण्याचे प्रयोजन लक्षात येत नाही. करारनामा तपासणीच्या नावाखाली लाखो रुपये खर्चून खासगी संस्थेला पोसण्याचा नवा गोरख धंद्दा सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न तर नाही ना? अशी शंका उपस्थित (PCMC) केली जात आहे. यामुळे मात्र, पालिकेस आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.