Pimpri : ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’ म्हणत सर्व पक्षीय आणि संघटनांचा मोर्चात सहभाग

एमपीसी न्यूज – सकल मराठा मोर्चा आणि मराठा बांधवांच्या वतीने शनिवारी (दि. ९) पिंपरी (Pimpri) -चिंचवड शहरात मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शहरातील सर्व पक्षीय आणि विविध संघटनांनी सहभाग घेतला. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी यावेळी सर्वांच्या वतीने करण्यात आली. तसेच जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीहल्ल्याचा यावेळी उपस्थितांनी निषेध व्यक्त केला. या आंदोलनासाठी विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.

Pimpri : अंमली पदार्थ पॉपी स्ट्रॉ विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

आमदार महेश लांडगे म्हणाले, “मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आम्हाला जे करावे लागेल ते आम्ही करत आहोत. यापुढेही करत राहू. मराठा मूक मोर्चा पासून आम्ही या आंदोलनाशी जोडलो आहोत. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा माझा कायम प्रयत्न राहील.”

मराठा महासंघाचे अध्यक्ष प्रकाश जाधव म्हणाले, “मागील चाळीस वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करीत आहे. मराठा समाजाचे 58 मूक मोर्चा राज्यभरात ठिकठिकाणी निघाले. या आंदोलनाला आजवर कुठेही गालबोट लागले नव्हते. पण जालना येथे आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि आजवरच्या आंदोलनाला प्रथमच गालबोट लागले.

या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी. आरक्षणाबाबत दोन समाजात तेढ निर्माण केली जात आहे. मात्र कुणीही अशा प्रकारात वाद घालू नये. मराठा समाजाला कुणाच्याही हिश्याचे आरक्षण नको आहे. मराठा समाजाला ओबीसी वर्ग दोन करून समाजाच्या टक्केवारी प्रमाणे अर्धे टक्के आरक्षण द्यावे. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणासाठी आरक्षणाची गरज आहे. राजकारण्यांनी मतांचे गणित न पाहता समाजाची गरज लक्षात घ्यावी.”

“गरीब आणि गरजू मराठा बांधवांची आरक्षण नसल्याने मोठी हानी होत असल्याचे शिरीष देवरे यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे विलास लांडे यांनी देखील मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली.

भाजपचे एकनाथ पवार म्हणाले, “मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवे. या मागणीसाठी हे आंदोलन केले जात आहे. हे आंदोलन कुठल्याही पक्षाचे नाही तर सर्वसामान्य मराठा समाजाचे आहे. प्रसंगी राजकीय पक्षाचा राजीनामा देईन पण मराठा समाजाच्या मागण्यांसाठी कायम कार्यरत राहीन.”

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि ओबीसी मध्ये समाविष्ट करून घ्यावे, असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रवीण कदम यांनी मांडले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिन भोसले म्हणाले, शासनाने मराठा आरक्षणाच्या बाबतीत अनाजी पंत प्रमाणे भूमिका घेतली आहे. ती खपवून घेतली जाणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे.”

राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे अजित गव्हाणे म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. शासनाने यातील सर्व बाबी पडताळून आरक्षण जाहीर करावे, अशी भूमिका यावेळी मांडली.

आंदोलनाच्या ठिकाणी अनेक राजकीय पुढारी जातात. फोटो काढतात आणि निघून जातात. ही भूमिका खपवून घेतली जाणार नसल्याचे नाना जावळे यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.