Pimpri Chinchwad : कंपनी प्रतिनिधींच्या तक्रारीवर पोलिस आयुक्तांचे तात्काळ आदेश

एमपीसी न्यूज : कपंनीच्या प्रतिनिधींना काहीही तक्रार (Pimpri Chinchwad) असल्यास त्यांनी समक्ष पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, अथवा फोनवर गोपनीय तक्रार द्यावी. तसेच यापुढे उद्योग क्षेत्राशी निगडित कोणतीही समस्या, अडचण तसेच असामाजिक तत्वे यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून कंपनी प्रतिनिधी यांना योग्य ते सहकार्य करण्यात येईल. उद्योग क्षेत्राशी निगडित कोणतीही अडचण निर्माण करणारा घटक मग तो कोणत्याही पक्षाचा, जाती धर्माचा असला तरीही त्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आवाहन केले.

ब्रिजस्टोन कपंनीच्या मिटिंग हॉलमध्ये आज (19 जानेवारी) चौबे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वरिष्ठ पातळीवरील दिलेल्या निर्देशांवरून पुढाकार घेऊन पोलीस विभाग व कंपनी व्यवस्थापक यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळेस त्यांनी हे आवाहन केले होते.

यापुढे पोलीस प्रशासनातर्फे कंपनी प्रतिनिधी यांच्या अडीअडचणी सोडविण्याकरिता वेळोवेळी एमआयडीसी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, माथाडी बोर्ड, नगरपरिषद, महानगरपालिका यांच्याशी समन्वय साधून, त्यांच्यासह बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय शिंदे (अप्पर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड) यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यानंतर फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे मोहन पाटील यांनी चाकण, खेड, तळेगाव व भोसरी एमआयडीसी या भागांची माहिती करून दिली. त्यानंतर बैठकीमध्ये पिंपरी चिंचवड आयुक्त यांनी व इतर मान्यवरांनी कंपन्यांचे प्रतिनिधींशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन, त्या सोडवण्याचा प्रयत्न केला.

त्यामध्ये विशेषतः कंपन्यांमधील चोरी, कामगार युनियन, कामगारांच्या (Pimpri Chinchwad) समस्या, माथाडी, चारित्र्य पडताळणी, सीसीटीव्ही कॅमेरे, ट्रॅफिक जाम, वाहन पार्किंग, महिला कामगार सुरक्षा, स्थानिक व राजकीय दबाव इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल यांनी या बैठकीबाबत सांगितले की, “कंपन्यांना माथाडी लोकांची दादागिरी सहन करावी लागत आहे. ते म्हणतात, की त्यांच्या रेट प्रमाणे त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट द्या. ते म्हणतील तेवढा पगार द्यावा. यावर आयुक्तांनी कंपन्यांना त्या विषयी तक्रार देण्यास सांगितले असून व त्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.”

पोलीस पेट्रोलिंग वाढवणार – 

बटवाल पुढे म्हणाले की, “कामगारांच्या पगारांच्या दिवशी त्यांचे मोबाईल आणि पगाराची रक्कम चोरटे चोरतात; त्यावर आयुक्त चौबे यांनी तेथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना औद्योगिक क्षेत्रामध्ये त्वरित पेट्रोलिंग वाढवण्याचे आदेश दिले आहेत.”

रॉंग साईड ड्रायव्हिंग थांबवणार व सिग्नल नसलेल्या चौकात ट्रॅफिक वार्डन नेमणार –

बटवाल म्हणाले की, “औद्योगिक क्षेत्रामध्ये रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे पुणे- नाशिक महामार्ग, तळेगाव- चाकण- शिक्रापूर रस्ता, निगडी चाकण एमआयडीसी रस्ता व इतर अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या होते. बऱ्याच रस्त्यांवर वाहने रॉंग साईडने चालवल्यामुळे वाहतूक कोंडी होते.

तसेच ज्या चौकांमध्ये तेथे लोक कसेही वाहने चालवतात. त्यामुळे ही वाहतूक कोंडी होते. यावर पोलीस आयुक्त चौबे यांनी वाहतूक विभागाला त्वरित रॉंग साईड ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करून ते थांबविण्यास सांगितले आहे.”

Alandi : रसिकलाल धारिवाल सभागृहात सह्याद्री इंटरनॅशनल स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

या बैठकीस विनयकुमार चौबे (पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त), रितेश कुमार (पुणे शहर पोलीस आयुक्त), सुनील फुलारी (विशेष पोलीस महानिरीक्षक), कोल्हापूर परिक्षेत्र, मनोज लोहिया, सह पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, संदीप कर्णिक, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस आयुक्त, पुणे शहर, रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त, पुणे शहर, संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, विवेक पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1, पिंपरी चिंचवड, अमोल झेंडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, प्रेरणा कट्टे, सहाय्यक पोलीस आयुक्त, चाकण विभाग, पिंपरी चिंचवड, तसेच महाळुंगे पोलीस चौकीचे ज्ञानेश्वर साबळे, चाकण पोलीस ठाण्याचे वैभव शिंगारे, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे रंजीत सावंत, भोसरी पोलीस ठाण्याचे भास्कर जाधव व भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे राजेंद्र निकाळजे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हजर होते.

यासोबत फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे अध्यक्ष शिवहरी हलन, खजिनदार विनोद जैन, सचिव दिलीप बटवाल व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

याशिवाय चाकण एमआयडीसी मधील महत्त्वाच्या कंपन्याही हजर होते. त्यामध्ये मर्सिडीज कंपनीचे सारंग जोशी, ब्रिजस्टोन कंपनीचे शिवाशिस दास, न्यू हॉलांड कंपनीच्या शितल साळुंखे, ह्युंडाई कंपनीचे मनीष फणसाळकर स्कोडा/ व्होलक्सवॅगन कंपनीचे रामहरी कुटे तसेच चाकण भोसरी तळेगाव व खेड एमआयडीसी मधील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विवेक पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ एक पिंपरी चिंचवड यांनी सर्वांचे आभार मानून, उपस्थित मान्यवरांच्या वतीने बैठक संपली असे जाहीर केले. या बैठकी करिता 210 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.