Pimpri: ‘रिंग’ करणा-या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रत्येक विकासकामाच्या निविदेत ‘रिंग’ होत आहे. सत्ताधारी भाजप पदाधिकारी, प्रशासन आणि ठेकेदार संगनमताने ‘रिंग’ करुन करदात्या जनतेच्या पैशांची लूट करत आहेत. गेल्या दोन महिन्यात स्थापत्य विषयक बारा कामे वाढीव दराने दिल्याने महापालिकेला सुमारे पंचवीस कोटींचा भुर्दंड सोसावा लागला आहे. स्थापत्यविषयक कामांना मोजकेच ठेकेदार निविदा भरतात. रिंग करुन त्यांच्यापैकी एकाला आळीपाळीने काम मिळत आहे. त्यामुळे रिंग करणा-या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

महापालिकेत रस्ते ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल आणि स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येते. या निविदा प्रक्रियेमध्ये सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी, अधिकारी, सल्लागार संगनमत करून निविदा प्रक्रिया राबवितात. विशिष्ट ठेकेदार डोळ्यांसमोर ठेवून त्यास पूरक अशा अटीशर्ती प्रशासनाच्य वतीने टाकण्यात येतात. त्यामुळे संबंधित ठेकेदारच पात्र ठरतो. ठराविक ठेकेदारांशिवाय नवीन ठेकेदारांना निविदा भरु ‍दिली जात नाही. भरल्यास राजकीय नेत्यांचे चेले दमबाजी करतात, दबाव टाकतात. यापुढे महापालिकेत कामे करु देणार नाही. अशी धमकी देतात. प्रसंगी मारहाण देखील केली जाते.

सत्ताधा-यांच्या संबंधित ठेकेदारांचीच चलती आहे. सत्ताधारी, प्रशासन आणि ठेकेदारांची रिंग असल्याने जनतेच्या पैशांची लूट होत आहे. गेल्या दोन महिन्यात स्थापत्यविषयक बारा कामे वाढीव दराने दिल्याने महापालिकेला सुमारे पंचवीस कोटींचा भुर्दंड सोसावा लागला आहे. स्थापत्यविषयक कामांना मोजकेच ठेकेदार निविदा भरतात. रिंग करुन त्यांच्यापैकी एकाला आळीपाळीने काम मिळत आहे. संतपीठासह विविध कामांमध्ये रिंग झाले आहे. त्यामुळे संबंधित याविषयाच्या निविदा रद्द करुन फेर निविदा मागव्यात. रिंग करणा-या सर्व ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.