Pimpri: घरपट्टी, पाणीपट्टीमध्ये वाढ करु नका; आमदार जगताप यांची आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिके तर्फे सन 2019-2020 या आगामी आर्थिक वर्षात घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात येऊ नये, अशी सूचना भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्तांना केली आहे. तसेच पाच वर्षांपूर्वीच्या अनेक बांधकामांची अद्यापही नोंदणी झाली नाही. अशा बांधकामांची नोंद करुन त्यांना कर आकारावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

याबाबत आमदार जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिकेच्या करसंकलन विभागामार्फत घरपट्टीच्या दरामध्ये दरवर्षी सुधारणा करण्यात येते. फेब्रुवारी अखेरपर्यंत कराचे दर निश्चित केले जातात. त्यानुसार सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता घरपट्टी दर सुधारित करण्याची प्रक्रिया सुरु असेल. महापालिका घरपट्टीकडे उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत म्हणून पाहत आहे. वाढीव करामुळे नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडते. त्यासाठी 2019-20 या वर्षात घरपट्टीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात येवू नये.

पिंपरी-चिंचवड शहरातील गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वींच्या ब-याचशा बांधकामांची अद्यापही नोंद झालेली नसल्याचे दिसते. तसेच त्या मिळकतींना कोणत्याही प्रकारचा कर आकारलेला दिसून येत नाही. त्यामुळे जुन्या बांधकांमाचा कर वाढविण्याऐवजी नवीन सर्व बांधकामांची नोंद करुन कर आकारणी करावी. त्यामुळे महापालिकेला कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न मिळेल. त्याचप्रमाणे पाणीपट्टीमध्ये देखील 2019-20 या आर्थिक वर्षात वाढ करु नये, अशी सूचना आमदार जगताप यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.