Pimpri : …तर महापालिका शाळेचा दर्जा उंचावण्यासोबतच विद्यार्थ्यांची पटसंख्याही वाढेल; आयुक्तांचा विश्वास

एमपीसी न्यूज – शाळा व्यवस्थापन समितीचे काम उत्तम पद्धतीने (Pimpri) होण्यासाठी विविध माध्यमांचा प्रभावी वापर करून पालक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी यांचा समन्वय वाढण्यावर भर द्यावा. या माध्यमातून निश्चितपणे शाळेचा दर्जा उंचावण्यासोबतच विद्यार्थ्यांची पटसंख्याही वाढेल, असा विश्वास आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला.

महापालिकेच्या वतीने प्राथमिक आणि माध्यमिक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, अधिकारी तसेच पालक यांच्या मेळाव्याचे आयोजन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते.

या मेळाव्यास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे तसेच प्रमुख वक्ते म्हणून भौतिकशास्त्रज्ञ डॉ. दिनेश नेहेते आणि शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी, महापालिका शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी समन्वय साधून याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे तसेच विद्यार्थ्यांना रोज शाळेत येण्यासाठी कसे प्रोत्साहन देण्यात येईल किंवा कोणकोणत्या उपाययोजना राबविण्यात येतील याच्यावरही काम केले पाहिजे.मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना महापालिका चांगल्या नियोजनासाठी सहाय्य करत असते. व्यवस्थापन समिती किंवा पालकांनी केलेल्या सूचनांचा निश्चितपणे विचार करून याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील. मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीने व्हॉट्स ऍप ग्रुपद्वारे किंवा मेसेजद्वारे पालकांपर्यंत सुचना पोहोचविल्या पाहिजेत.

एखाद्या विद्यार्थ्याची हजेरी 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे तर याबाबत त्याच्या पालकांकडे वारंवार चौकशी केली पाहिजे. जर संपर्क झाला नाही तर त्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन पालकांना किंवा विद्यार्थ्याला येणाऱ्या समस्या तुम्ही जाणून घेतल्या पाहिजेत. पालकांनीही कामातून वेळ काढून आपल्या पाल्याला विश्वासात घेऊन त्यांच्या भविष्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे.

विद्यार्थ्याचा अभ्यास, आरोग्य, शारिरिक, सर्वांगीण प्रगतीबाबत पालकांनी संवाद साधला पाहिजे. व्यवस्थापन समिती आणि (Pimpri) शिक्षकांचीही त्यामध्ये महत्वाची भूमिका आहे. आपला केंद्रबिंदू हा आपल्या शाळेतील विद्यार्थी आहे ज्याला आपल्याला घडवायचं आहे या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, असेही आयुक्त सिंह यावेळी म्हणाले.

प्रमुख वक्ते डॉ. दिनेश नेहेते ‘मुलांच्या विकासात पालकांची भूमिका’ या विषयावर बोलताना म्हणाले, पालक आपल्या पाल्याला शाळेतील वातावरण सुरक्षित असते यासाठी पाठवतात पण घरातील किंवा घराच्या आजूबाजूचे वातावरणही तितकेच सुरक्षित असणे गरजेचे आहे.

YCMH : ‘एमआरआय’मध्ये सवलत द्या; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निर्देश

मुलांना ज्या गोष्टी माहिती नाहीयेत त्या गोष्टींबद्दल त्यांना अवगत करून देणे महत्वाचे आहे आणि ही शिक्षकांसोबत पालकांचीही जबाबदारी असून पालकत्वाचे काही टप्पे आहेत जे समजून घेणे महत्वाचे आहे. कामाच्या व्यापातून मुलांना वेळ कसा देणार ही प्रत्येक पालकाची तक्रार असते पण जोपर्यंत तुम्ही आपल्या पाल्यांना वेळ देणार नाही, त्यांना प्रेम करणार नाही, शाळेत काय शिकविले याबद्दल रोज विचारपूस करणार नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये अभ्यासाची आवड निर्माण होणार नाही. पालकांनी जर रोज ही गोष्ट केली तर तुमच्या पाल्याची आपोआप प्रगती होईल.

पालकांनी आपल्या पाल्यांना जसं आहे तसं स्विकारलं पाहिजे. जर मुले पालकांचे ऐकत नसतील तर कुठेतरी पालकांचे प्रेम कमी पडत आहे. पालकांनी पाल्यांना शाळेतील स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे तसेच स्पर्धेत जरी तो पराभूत झाला तरी स्पर्धेतून त्याला काय शिकायला मिळाले याबद्दलही पालकांनी आपल्या पाल्याची विचारपूस केली पाहिजे, असेही डॉ. नेहेते यावेळी म्हणाले.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, शाळा व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापक आणि महापालिका यांच्या समन्वयाने महापालिका शाळांमधील तक्रारींची संख्या कमी झाली असून शिक्षक, पालक मुख्याध्यापकांना कोणतीही समस्या आढळल्यास थेट सारथी पोर्टलद्वारे ते महापालिकेस याबाबत अवगत करू शकतात.

येत्या काही दिवसांत पवित्र पोर्टल कार्यान्वित केले जाणार आहे जेणेकरून शिक्षक भरतीची प्रक्रिया अधिक सोयीस्कर होणार आहे. महापालिका शाळांसाठी शिक्षण विभागाच्या वतीने अनेक उपाययोजना राबविण्यात येत असून विविध विभागांसोबत बैठका घेऊन शाळांची गुणवत्ता वाढविण्यावर भर दिला जात आहे अशी माहिती त्यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.