Pimpri News: एप्रिलमध्ये सर्वाधिक 27.32 टक्के तर ऑगस्टमध्ये सर्वांत कमी 3.69 टक्के पॉझिटिव्हिटी रेट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या सद्य:स्थितीत कमी होत आहे. परिणामी, पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यू दर कमी झाला आहे. चालू आठवड्यात शहराचा पॉझिटिव्हिटी रेट 3.69 टक्के होता. कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासूनचा हा सर्वांत कमी पॉझिटिव्हिटी रेट आहे.

कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासूनचा सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट हा यंदाच्या एप्रिल महिन्यात होता. एप्रिलमध्ये शहराचा पॉझिटिव्हिटी रेट 27.32 होता. हा आतापर्यंतचा सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट आहे.

10 मार्च 2020 पासून कोरोनाचे संकट सुरू झाले होते. त्या वेळी मार्च आणि एप्रिल महिन्यात 4.10 टक्के पॉझिटिव्हिटी रेट होता. त्यानंतर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसगणिक वाढत राहिली. मागील वर्षी मे महिन्यात 11.96 टक्के पॉझिटिव्हिटी रेट होता. त्यानंतर जूनमध्ये पॉझिटिव्हिटी रेटमध्ये दुपट्टीने वाढ झाली. पॉझिटिव्हिटी रेट 20.97 टक्क्यांवर गेला. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा उद्रेक वाढला. याकाळात ऑगस्टमध्ये 25.29 टक्के, तर, सप्टेंबरमध्ये 25.20 टक्के पॉझिटिव्हिटी रेट होता.

सप्टेंबरनंतर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये 11.80 टक्के पॉझिटिव्हिटी रेट होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये तो खाली येत 6.68 टक्के एवढा  होता. डिसेंबरमध्ये 5.76  टक्क्यांपर्यंत पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला होता. चालू वर्षाच्या सुरुवातीला शहरातून कोरोना संपला, अशी स्थिती निर्माण झाली होती. रुग्णसंख्या 100 च्या आतमध्ये आली होती. परंतु, फेब्रुवारीनंतर शहरात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. ही लाट तीव्र होती. मे महिन्यापर्यंत शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली. त्यानंतर जूनपासून पुन्हा रुग्ण संख्या कमी होण्यास सुरुवात झाली. आता ऑगस्टमध्ये रुग्णसंख्या स्थिर आहे. 150 च्या आसपास नवीन रुग्णांची दिवसाला नोंद होत आहे. शहराचा पॉझिटिव्ह रेट साडेतीन टक्क्यांच्या आसपास आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.