Pimpri News : गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा – प्रशासनाचे मंडळांना आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोना साथीमुळे मागील वर्षी गणेशोत्सव आणि अन्य सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले. कोरोनाची साथ अद्याप संपलेली नाही. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य, महापालिका, नगरपरिषद, देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ, अग्निशमन दल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस यांच्यातील समन्वयासाठी गुरुवारी (दि. 2) पिंपरी येथे एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला सर्व गणेश मंडळाच्या उपस्थित पदाधिका-यांनी संमती दर्शवली.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या वेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, मंचक इप्पर, आनंद भोईटे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील गणेश मंडळांचे पदाधिकारी, शातता कमिटीचे सदस्य, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते.

10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत यावर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीत गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिका-यांनी त्यांना येणा-या अडचणी प्रशासनाकडे मांडल्या. त्यावर योग्य उपाययोजना करण्याचे सूचित करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.