Ganeshotsav Instructions : गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – गणेशोत्सव साजरा (Ganeshotsav Instructions) करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील गणेश मंडळांनी तसेच नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या पथदिव्यांच्या खांबाचा आधार न घेता तसेच पथदिव्यांचा पोल व मांडव यामध्ये सुरक्षित अंतर ठेवून श्रीगणेशोत्सव मंडळाची उभारणी करावी. विद्युत सुरक्षिततेबाबत महापालिकेने दिलेल्या सूचना कटाक्षाने पाळून सर्व गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेस सहकार्य करून अधिकृत वीज जोडणी घेऊन हा गणेशोत्सव आनंदात साजरा करावा, असे आवाहन विद्युत विभागाचे सह शहर अभियंता संजय खाबडे यांनी केले आहे.

नागरिकांच्या सार्वजनिक सुरक्षिततेकरीता महापालिकेमार्फत पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील इमारती, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावरील प्रकाश व्यवस्थेकरीता दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.  दिवाबत्ती प्रकाश व्यवस्थेच्या देखभाल दुरुस्तीचे काम महानगरपालिकेमार्फत आवश्यकतेनुसार करण्यात येते. महापालिकेच्या सर्व विद्युत अभियंत्यांमार्फत शहरवासियांच्या सुरक्षिततेसाठी पिंपरी- चिंचवड शहरातील पथ दिव्यांच्या सर्व खांबांची तपासणी करण्यात आली आहे.

धोकादायक परिस्थितीमध्ये एकही पोल आढळून येणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. तथापि, विजेच्या खांबाला शॉक लागणे, गंजलेला व धोकादायक खांब, तुटलेला जंक्शन बॉक्स, फिडर पिलर आढळल्यास नागरिकांनी महापालिकेच्या दुरध्वनी क्रमांकावर किंवा महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. तसेच, दिवाबत्ती प्रकाश व्यवस्थेच्या कामांमध्ये काही उणीवा, त्रुटी अथवा कोणतेही असुरक्षिततासदृश्य परिस्थिती आढळल्यास नागरिकांनी (020) 67333333, सारथी हेल्पलाईन – 8888006666 या संपर्क क्रमांकावर किंवा सारथी ऑनलाईन तक्रार नोंदणी    [email protected] या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. असे विद्युत विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने श्री गणेशोत्सवासाठी तात्पुरती वीज जोडणी अगदी अल्प दरात व अल्पकाळात देण्याची व्यवस्था केलेली आहे. श्रीगणेशोत्सवासाठी वीजजोडणी पथदिव्यांच्या खांबावरील जंक्शन बॉक्स अथवा फिडरपिलरमधून घेऊ नये. सर्व श्रीगणेशमंडळांनी याचा लाभ घेऊन अनधिकृत वीज जोडणी टाळावी तसेच विद्युत सुरक्षा पाळून जीवितहानी (Ganeshotsav Instructions) टाळावी.

MPC News online Bappa : एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा स्पर्धेत सहभागी व्हा, जिंका चांदीची नाणी!

दरम्यान,  महापालिकेकडून इमारती व दिवाबत्तीच्या खांबांमधून प्रकाश व्यवस्थेकरीता थ्री फेज 440 व्होल्टचा वीजपुरवठा केला जातो. तरी नागरिकांनी सुरक्षिततेबाबत महापालिकेने दिलेल्या सूचनांचे कटाक्षाने पालन करावे. नागरिकांनी पथदिवे खांब व विद्युत य़ंत्रणेशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करु नये, खांबाला आणि फिडर पिलरला स्पर्श करु नये, पथदिवे खांबातुन विनापरवाना वीज घेऊ नये, जनावरे खांबांना बांधु नयेत, जंक्शन बॉक्सवर पाय ठेवून खांबावर चढु नये, कपडे वाळत घालण्यासाठी खांबांना तारा बांधू नये, बांधकामामध्ये पथदिव्यांचे खांब घेऊ नये, खांबांना फ्लेक्स, होर्डिंग्ज बांधू नये, कोणत्याही प्रकारची केबल अथवा तार खांबावरुन ओढू नये. अशा विविध प्रकारच्या कृत्यामुळे जीवितास धोका उत्पन्न होण्याची किंवा जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी. अशा प्रकारच्या कृत्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्त हानी झाल्यास महानगरपालिका अशा घटनेस जबाबदार राहणार नाही, अशी माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.