Pimpri News: विधवा महिलांना कोरोना योजनेचा लाभ मिळण्यासाठी वयाची अट शिथील करण्याची मागणी

एमपीसी न्यूज –  कोरोनामुळे पतीचे निधन झालेल्या शहरातील महिलांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे दिल्या जाणा-या 25 हजारांच्या अर्थसहाय्य योजनेतील 50 वर्षे वयाची अट शिथील करण्याची मागणी उपमहापौर हिराबाई घुले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात उपमहापौर घुले यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत कोरोना काळात ज्या महिलांचे पती कोरोना संसर्गाने बाधित होऊन मृत्यू पावले आहेत, अशा महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने अर्थसहाय्य योजनेत वाढ केली. नागरवस्ती विभागाकडील विधवा अर्थसाहाय्य योजनेत 10 हजार रुपयांऐवजी 25 हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जात आहे. या योजनेअंतर्गत अर्जदार महिलेचे वय 50 वर्षांपर्यंत असावे, अशी अट आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेत बऱ्याच कुटुंबांतील कर्त्या व्यतींचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर कुटूंबाची वाताहत होते. तसेच ज्या महिलांचे पती हे कोरोना संसर्गाने मृत्यू पावले आहेत. परंतु, काही विधवा महिलांचे वय 50 वर्षे पेक्षा जास्त आहे. अशा सर्व विधवा महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी 50 वर्षे वयाची अट तत्काळ शिथील करावी. जेणेकरुन या महिला योजनेपासून वंचित राहणार नाहीत. योजनेअंतर्गत जास्तीत-जास्त विधवा महिलांना आर्थिक सहाय्य लाभल्याने त्यांच्या कुटुंबास हातभार लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.