Pimpri News:  …म्हणून हातावर ‘देवेंद्र’ नावाचा टॅटू कोरला – नरेंद्र पाटील

एमपीसी न्यूज – मी राष्ट्रवादीकडून विधानपरिषेदवर आमदार असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी मदत केली. मान सन्मान दिला. त्यानंतर आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावरही काम करण्याची संधी त्यांनी दिली. त्यामुळे त्यांच्यावरील माझे प्रेम वाढले. त्या प्रेमापोटी मी हातावर ‘देवेंद्र’ नावाचा टॅटू कोरला असल्याचे माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांचे उभरते, चांगले नेतृत्व आहे. भविष्यामध्ये त्यांच्याकडून चांगली कामे होणार आहेत, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत काम करीत आहोत, असेही ते म्हणाले.

पिंपरीत आज (बुधवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके, महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संयुक्त सरचिटणीस रविकांत पाटील, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाले, माथाडी युनियन पुणे विभाग सचिव हणमंत तरडे, माथाडी युनियनचे माजी अध्यक्ष पोपटराव धोंडे, कामगार प्रतिनिधी विक्रम मोरे, अशोक साबळे, अमोल तव्हरे, उत्तम शिंदे, मंगेश घोलप, नवनाथ शेवाळे आदी उपस्थित होते.

नरेंद्र पाटील म्हणाले, ”पुणे, पिंपरी- चिंचवड, मुंबई, ठाणे औद्योगिक पट्ट्यासह सातारा एमआयडीसीत बरेचशे कारखानदार माथाडी कामगार कायद्याचे उल्लंघन करतात. या विषयी वारंवार कामगार आयुक्त, माथाडी बोर्ड आणि पोलीस प्रशासनाला कळविले आहे. माथाडी कामगार कायद्याची शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी अशी आमची मागणी आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.