Pimpri: डॉक्टरांना कायम करण्याच्या उपसूचनेवरुन सत्ताधा-यांमध्ये दुफळी!

उपसूचना मागे घेण्याची नामुष्की

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएमएच) मानधन तत्वावरील 53 डॉक्टरांना महापालिका सेवेत कायम करण्याच्या ‘अर्थपूर्ण’ उपसूचनेवरुन भाजपमध्ये दुफळी माजली. भाजप नगरसेवकांनी प्रस्तावाला कडाडून विरोध केला. वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागू असा निर्वाणीचा इशारा दिला. तर, जिद्दीला पेटलेल्या सभागृह नेत्यांनी थेट मतदानाचा पुकारा केला. त्यानंतर भाजपच्या आशा शेंडगे यांनी आक्रमक भूमिका घेत. महापौरांच्या आसनासमोर धाव घेतली. अखेरीस महापौर जाधव यांनी समन्वयाची भूमिका घेत मूळविषयच तहकूब केला. त्यामुळे उपसूचना मागे घेण्याची नामुष्की सत्ताधा-यांवर ओडावली.

पिंपरी-चिंचवड महापलिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब महासभा आज (शुक्रवारी) पार पडली आहे. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. विषयपत्रिकेवर 13 व्या क्रमांकावर स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता देवन्ना गट्‌टुवार यांना सह शहर अभियंतापदी बढती देण्याचा प्रस्ताव होता. त्याला नामदेव ढाके यांनी वायसीएमएचमधील मानधन तत्वावरील 53 डॉक्टरांना महापालिका सेवेत कायम करण्याची आणि महापालपालिके सेवेतील प्रतिनियुक्तीवरील मुदत संपलेले पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम संस्थेचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. पंडीत पद्माकर यांना कायम करण्याची उपसूचना दिली. त्यामुळे सभागृहातील वातावरण गरम झाले. भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले.

  • भाजपच्याच नगरसेविका आशा शेंडगे यांनी त्याला जोरदार विरोध केला. त्या म्हणाल्या, डॉ. पंडीत पद्माकर यांची महापालिकेतील प्रतिनियुक्तीवरील मुदत 17 फेब्रुवारीला संपली आहे. मुदत संपल्यानंतरही ते स्थायी समितीच्या सभेला कसे उपस्थित राहिले. आजही ते लुडबूड करत आहेत. कोणत्या अधिकारात ते सभेला आले आहेत. अधिका-यांना नियम नाहीत का?, केवळ नगरसेवकांनाच नियम आहेत. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच पदव्युत्तर वैद्यकीय संस्था सुरु करण्यास एक वर्ष विलंब झाला. अशा अधिका-यांसाठी आपण कशासाठी पायघड्या घालत आहोत. त्यांना कायम वेतनश्रेणीत कसे सामावून घेऊ शकता.

तसेच मानधनतत्वावरील 53 डॉक्टरांना महापालिका सेवेत कायम कसे करु शकतात. जाहिरात देऊन नवीन डॉक्टर भरण्यात यावेत. चुकीच्या पद्धतीने सभागृह चालू दिले जाणार नाही. कोणावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. चुकीच्या प्रथा पाडू नयेत. या उपसूचनेला आपला विरोध आहे. उपसूचना मंजूर केल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल.

भाजपचे संदीप वाघेरे म्हणाले, ‘ही उपसूचना मंजूर करण्यात येऊ नये. त्याला माझा विरोध आहे. चुकीच्या पद्धतीने मंजूर केल्यास न्यायालयात जाईन’.

  • राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या, पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेस परवानगी मिळाली म्हणून डॉक्टरांना महापालिका सेवेत कायम करण्याची सुपिक कल्पना कोणाच्या डोक्यातून आली. ही चुकीची प्रथा पाडू नये. 53 डॉक्टरांची जाहिरात देण्यात यावी. नामांकित डॉक्टर येतील. हा विषय मंजूर करण्यात येऊ नये. मंजूर करायचा असल्यास मतदान घेण्यात यावे. मुदत संपल्यानंतरही अधिका-यांना सभेला कसे बसू दिले जाते. शिक्षक, डॉक्टरांचा जसा पुळका आला. तसा मानधनतत्वावरील घंटागाडी कर्मचारी का दिसले नाहीत. ते न्यायालयीन लढा देत आहेत. त्यांना का कायम करु शकत नाहीत.

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, वायसीएममधील दुरावस्थेला आपण राज्यकर्तेच जबाबदार आहोत. आजपर्यंत वायसीएममध्ये आपल्या मर्जीतील अधिका-यांना बसविले. वायसीएमचे ऑडीट करण्यात यावे. नगरसेवकांनी माहिती घेऊन बोलावे. कोणाच्या दबावाखाली जायचे नाही. हा विषय मंजूर करण्यात यावा. त्यावर माजी महापौर कदम यांनी मतदान घेण्याची मागणी केली.

  • महापौरांनी मतदान पुकारले. पवार यांनी मतदान घेण्याची मागणी करत भाजपचे नगरसेवक प्रस्तावाच्या बाजूने तर ज्याला विरोधात मतदान करतील त्यांनी मतदान करावे, असे सांगितले. त्यावर आशा शेंडगे यांनी पुन्हा बोलण्याची परवानगी मागत महापौरांच्या हौदासमोर धाव घेतली. गोंधळ होण्याची शक्यता दिसताच महापौर जाधव यांनी समन्वयाची भूमिका घेत मूळविषयच तहकूब केला. त्यामुळे उपसूचना मागे घेण्याची नामुष्की सत्ताधा-यांवर ओडावली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.