Pune : राज्यासह देशातही बदलाचे वारे, पुण्यात काँग्रेसला यश मिळणार – पृथ्वीराज चव्हाण यांना विश्वास

एमपीसी न्यूज – राज्यासह देशातही बदलाचे वातावरण आहे, त्यामुळे पुण्यासह सांगलीतही काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. पुणे आणि सांगली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आज पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पुणे आणि सांगली लोकसभेसाठी एकापेक्षा अधिक नावाची चर्चा होती. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. काँग्रेसचा उमेदवार अद्यापही निश्चित झाला नाही. तसेच केंद्रात आता कसल्याही परिस्थितीत भाजपची सत्ता येणार नाही. भाजपला किमान १०० जागांचा तोटा सहन करावा लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

भाजप-सेना युतीबद्दल बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, युती होणार याची खात्री होती. याप्रकरणी उद्धव ठाकरेची भूमिका प्रशचिन्ह निर्माण होती. प्रकाश आंबेडकर संसदेत यावेत, ही आमची इच्छा आहे. प्रकाश आंबेडकरांना आम्ही ऑफर दिली आहे. पण, ते गंभीर आहेत असं वाटत नाही. आम्ही आमच्या बाजूने त्यांना ऑफर दिली आहे. ते संसदेत यावेत यासाठी, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. पण, त्यांचा काही वेगळा प्लॅन असेल तर आम्हाला माहीत नाही. मतांचं विभाजन व्हावं, अशी भाजपची इच्छा असेल आणि त्याला जर कोणी मदत करत असेल तर त्याला कोणी काही करू शकत नाही. भाजपच्या एका उमेदवारासमोर महाआघाडीचा एकच उमेदवार असावा, अशी आमची इच्छा आहे. मताच विभाजन टाळलं पाहिजे, त्यासाठी आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.