Pimpri : खिंवसरा पाटील विद्यामंदिरमध्ये सातवीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ

एमपीसी न्यूज – थेरगाव, गणेशनगर मधील क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिर संचलित खिंवसरा पाटील विद्यामंदिरमध्ये इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी एअरफोर्स वॉरंट ऑफिसर गोपाळ जयसिंग शिंदे, क्रांतिवीर चापेकर समितीचे संचालक गतिराम भोईर, शालेय समिती अध्यक्षा प्रा. सौ. नीता मोहिते, व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे, खिंवसरा पाटील विद्यामंदिरचे मुख्याध्यापक नटराज जगताप, लोकमान्य टिळक विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर, बालवाडी विभाग प्रमुख अशा हूले आदी उपस्थित होते.

  • “सुर से सुर मिला के” ह्या गीताने मान्यवरांचे स्वागत इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी केले. सुधाकर हांडे यांनी बालपणापासून विद्यार्थ्यांवर शाळा संस्कार करत असते, माणुसकी आणि आपुलकी जपा, संवेदनशील संक्रमणशील असा हा काळ आहे. जीवनरुपी पतपेढी मध्ये चांगल्या संस्कारांची बचत आणि संचय असेल तर भविष्य उज्ज्वल बनते. शाळेचे नाव उज्ज्वल करा. अशा शुभेच्छा देऊन मान्यवरांचा परिचय करून दिला.

संचिता काशिंदे या विद्यार्थिनीने “अनुस्वाराचे कुंकु भालावरी”हे गीत सुरेल आवाजात गाऊन मराठी भाषा कशी नटलेली आहे याचे वर्णन केले. तसेच पुलवामा हल्ल्याचे वर्णन करणारे “पुलवामा में उन वीरोने जान देस पे गवारी है।”हे गीत गायले.

  • सायली पारधे, श्रद्धा डुकरे, पायल गायकवाड, आदित्य ढेंबरे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की ही शाळा व तसेच शाळेतील सर्व शिक्षक आम्हाला खूप खूप आवडतात व आठवीला दुसऱ्या शाळेत जावेसे वाटत नाही. या शाळेने आमच्यावर खूप चांगले संस्कार केलेले आहेत व या संस्काराची शिदोरी घेऊन आम्ही नक्कीच उंच शिखर गाठू असे आश्वासन विद्यार्थ्यांनी दिले. शाळेतील शिक्षिका कृतिका कोराम, वर्गशिक्षिका सविता पाठक यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी एअरफोर्स वॉरंट ऑफिसर गोपाळ शिंदे म्हणाले की, राष्ट्रपती अब्दुल कलाम, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या घरची परिस्थिती सुद्धा तुमच्यासारखीच गरिबीची होती तरीसुद्धा त्यांनी परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घेतले व यशस्वी झाले. त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा ध्येय निश्चित करा व यशस्वी व्हा. एनडीएमध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणकोणती तयारी करावी लागते याबद्दलचे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. तसेच वायु सेनेत असताना त्यांना आलेले काही अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले व देशसेवेची प्रेरणा विद्यार्थ्यांच्या मनात जागृत केली. विशेष यावेळी दुपार सत्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

  • यावेळी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात निखिल आगवणे, आदित्य ढेंबरे, साक्षी चक्रनारायण, पायल गायकवाड या विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला. तसेच १०० टक्के उपस्थित असणारे विद्यार्थी, उपक्रमशील विद्यार्थी, सक्रिय विद्यार्थी, विशेष पुरस्कार इत्यादी बक्षिसे देण्यात आली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा आखाडे व आभार पुष्पा जाधव यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.