Dighi  : ‘डिफेन्स एक्स्पो’ला विद्यार्थी आणि उद्योजकांचा भरभरून प्रतिसाद

एमपीसी न्यूज – इंटरनॅशनल एक्झिबिशन ॲण्ड कन्व्हेन्शन सेंटर मोशी (Dighi  )येथे सुरू असलेल्या देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या भव्य ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’मध्ये प्रदर्शित संरक्षण तंत्रज्ञान आणि सामुग्री पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशीही विद्यार्थी, नागरिक तसेच उद्योजकांनी गर्दी केली.

दुपारपर्यंत एक लाख 20 हजारापेक्षा अधिक नोंदणी झाली असून संरक्षण विषयक आधुनिक तंत्रज्ञानाविषयी जाणून घेण्यात तरुणाईने विशेष रस दाखविला आहे.

राज्याचा उद्योग विभाग आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (Dighi  )यांच्या पुढाकाराने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. देशातील संरक्षण उत्पादन क्षेत्रातील शासकीय संस्थांसह अनेक मोठ्या खाजगी संस्था आणि एमएसएमईंनी यात सहभाग घेतला असल्याने प्रदर्शन विशेष ठरले आहे. देशाच्या संरक्षण सज्जतेच्याच्यादृष्टीने अलौकीक कार्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी प्रदर्शनामध्ये पन्हाळा, सिंधुदुर्ग, शिवनेरी व रायगड किल्ल्यांच्या नावाने चार भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. प्रत्येक मंडपामध्ये सुमारे 100 ते 150 दालने आहेत. संपूर्ण परिसरात महाराजांच्या गड-किल्ल्यांची संकल्पना चित्रीत करण्यात आली आहे.

देशाची संरक्षण सिद्धता पाहण्याचा रोमांचित करणारा अनुभव

 

प्रदर्शनात एमएसमएईंची 418 लहान आणि 33 मोठी दालने आहेत. भारतीय लष्कराच्या तीन्ही दलांनी प्रदर्शनात सहभाग घेतला असून अत्याधुनिक संरक्षण सामुग्री प्रदर्शित केली आहे. युद्धात उपयोगता येणारी प्रक्षेपणास्त्रे, रणगाडे, हेलिकॉप्टर, विविध प्रकारच्या गन्स जवळून पाहण्याचा रोमांचित करणारा अनुभव नागरिकांना घेता येत असल्याने आबालवृद्धांमध्ये उत्साह दिसत आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तज्ज्ञांना प्रश्न विचारून माहिती जाणून घेत आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील उद्योजक, लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांचा सहभाग असलेली चर्चासत्रेदेखील अभियांत्रिकीचे विद्यार्थी आणि एमएसएमईंना उपयुक्त ठरत आहेत. या चर्चासत्रांनाही चांगली उपस्थिती लाभली आहे.

 

युवकांना संरक्षण क्षेत्रातीली संधींची माहिती

 

राज्यात प्रथमच होत असलेल्या या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांमध्ये युवकांची संख्या अधिक आहे. जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरीलही महाविद्यालयांचे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले आहेत. तरुणांना भारतीय वायुसेनेत सहभागी होण्यासाठी आकर्षित करण्यासाठी हवाई दलाने या ठिकाणी माहिती देणारा कक्ष उभारला आहे. वायुसेनेच्या विविध कामांची आणि हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी या ठिकाणी इंडक्शन पब्लिसिटी अॅण्ड एक्झिबिशन व्हेईकल (आयपीईव्ही) ठेवण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाच्या सेवेत अधिकारी म्हणून तसेच अग्निवीरवायू (पुरुष आणि महिला) म्हणून रुजू होण्याचे फायदे काय आहेत, तसेच रुजू होण्यासाठी नियमांबद्दल माहिती देण्यात येत आहे.

आत्मनिर्भर भारताचे दर्शन

 

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) प्रयोगशाळा, सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उत्पादन संस्था (डीपीएसयु) आणि खासगी क्षेत्रातील संरक्षण साहित्य निर्मात्या कंपन्या प्रदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या असून त्यांनी प्रदर्शित केलेल्या उत्पादनांद्वारे संरक्षण क्षेत्रात देशाने ‘आत्मनिर्भरते’च्या दिशेने  केलेल्या प्रगतीचे दर्शन होत आहे. भारताने सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांद्वारे सशस्त्र दलांच्या गरजा, संशोधन आणि विकास आणि संरक्षण उत्पादन याची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे.

 

प्रदर्शनात मांडण्यात आलेले आकाश आणि समर क्षेपणास्त्र प्रणाली, याशिवाय नवीन पिढीचे कमी वजनाचे प्रगत हेलिकॉप्टर एमके-IV आणि लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर, बोफोर्स गन, वज्र टॅंक, भिष्म टँक, इन्फँन्ट्री कॉम्बॅट व्हेईकल, धनुष, एलएसव्ही, रुद्र, समर-2, जमीनीवरून हवेत मारा करणारे प्रक्षेपास्त्र, पिनाका क्षेपणास्त्र प्रणाली, अँटी सबमरिन क्षेपणास्त्रे, विविध युद्धनौका, पानबुड्यांच्या प्रतिकृती अशी उन्नत आयुधे खास आकर्षण ठरत आहे. या आुयधांसोबत सेल्फी घेण्याचा आनंदही नागरिक घेत आहेत.

Alandi : तीर्थक्षेत्र देहू-आळंदी आणि चऱ्होली येथील इंद्रायणी नदी घाट निरंकारी स्वयंसेवकांनी केला स्वच्छ

डिआरडीओनेदेखील आपले उन्नत तंत्रज्ञान येथे प्रदर्शित केले आहे. त्यात पिनाका मिसाईल, रॉकेट, रॉकेट लाँचर, अभ्यास, रॉकेट लाँचींग सिस्टीमचा समावेश आहे. दक्ष डिफ्युजरसारखे उन्नत रोबोटीक्स तंत्रज्ञानही येथे प्रदर्शित करण्यात आले आहे. खाजगी संस्थांनीदेखील विविध तंत्रज्ञानांनी सज्ज वाहने, टँक, शस्त्रास्त्रे येथे प्रदर्शित  केलेली आहेत. भारतीय वायुदलाने ‘नाविन्यतेच्या माध्यमातून आत्मनिर्भरता’ ही संकल्पना स्पष्ट करणारी विविध उत्पादने येथे प्रदर्शित केली आहेत.

 

संपूर्ण परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच ऑनलाइन नोंदणीची सुविधा असल्याने करणे सुलभ आहे. प्रवेशद्वारापासूनच्या मार्गावर दुतर्फा राज्यातील गड-किल्ल्यांची लावण्यात आलेली छायाचित्रे शालेय विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली होती. उद्या (सोमवार) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून अधिकाधिक उद्योजकांनी प्रदर्शाला भेट द्यावी,असे आवाहन उद्योग विभागातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.