PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी दुःख बाजूला सारत केले आपले कर्तव्यपालन; जगभरातून होते आहे कौतुक

एमपीसी न्यूज- (श्याम मालपोटे) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन यांचं आज (30 डिसेंबर)पहाटे अहमदाबादमध्ये निधन झाले. हिराबेन यांच्या पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आईचं निधन आणि तिच्या अंत्यविधीनंतर नरेंद्र मोदी यांनी स्वतःचं दुःख बाजूला ठेवून, लगेच सरकारी कामं करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. मोदींच्या व्यक्तिमत्त्वातला हा गुण त्यांचं वेगळेपण सिद्ध करणारा ठरला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं आज वृद्धापकाळाने निधन झाले. अंत्यसंस्कारापूर्वी नरेंद्र मोदी यांनी आईच्या पार्थिवाला खांदा दिला. गेली आठ वर्षं देशाचे पंतप्रधान म्हणून आणि त्याआधी सुमारे साडेतेरा वर्षं गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदींना त्यांच्या सुशासनामुळे देश आणि जगभरात त्यांना प्रसिद्धी मिळतआहे; पण इथे मोदी ना पंतप्रधानांच्या भूमिकेत होते, ना देश किंवा जगातल्या प्रशंसनीय नेत्याच्या. इथे ते मोदी होते जे त्यांच्या आई हिराबेनचे नरेंद्र होते. स्मशानभूमीत उपस्थित असलेल्या 50 ते 60 जणांमध्ये पंतप्रधान मोंदीच्या चेहऱ्यावरच्या भावना स्पष्ट दिसत होत्या. तत्पूर्वी नरेंद्र मोदी यांनी भावाच्या घरी फारवेळ घालवला नाही. आईचं पार्थिव वाहनात ठेवून गांधीनगरच्या सेक्टर 30 मधल्या मुक्तिधामध्ये आणण्यात आलं. सकाळी नऊ वाजून बावीस मिनिटांनी हिराबेन यांना मुखाग्नी देण्यात आला. या वेळी पंतप्रधान मोदींसमवेत थोरले भाऊ सोमाभाई आणि धाकटे बंधू पंकज मोदी उपस्थित होते.

नरेंद्र मोदी यांनी साश्रू नयनांनी आपल्या आईला शेवटचा निरोप दिला. आईला डोळे भरून पाहण्याची ही शेवटची वेळ होती. वैयक्तिक दुःखद प्रसंगामुळे सार्वजनिक कामांमध्ये अडथळा निर्माण व्हायला नको, यासाठी मोदींनी अर्ध्या तासानंतर राज्य सरकारचे मंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना स्मशानातून जाण्याची सूचना केली. त्यांनी बहुतांश सहकारी, मंत्र्यांना अंत्यसंस्काराला येण्यास मनाई केली होती. स्वतःच्या पक्षातले नेते, केंद्रातले मंत्री आणि मुख्यमंत्र्यासह अन्य राज्यांमधील विरोधीपक्षाच्या मु्ख्यमंत्र्यांनीही मोदी यांच्या आईच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली होती; पण त्यांना यासाठी नकार कळवण्यात आला होता.

Pune News : ऑटोरिक्षा व तीनचाकीसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

जो मुलगा काही वेळेपूर्वी आपल्या (PM Narendra Modi) आईच्या चितेजवळ होता, तो काही मिनिटांनी देशाचा पंतप्रधान म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पश्चिम बंगालमधल्या जनतेसाठी पायाभूत सुविधांशी निगडित 7800 कोटी रुपयांचा प्रकल्प लाँच करत होता. हीच गोष्ट मोदींना खास बनवते. त्यांच्या या गुणांबद्दल हिराबेन यांना अभिमान होता. आता आठवणींमधून त्याच मोदींना प्रेरणा देत राहतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.