Pune : ‘अण्णासाहेब नातू चॅम्पियन्स प्रोजेक्ट’ घडविणार बॅडमिंटन खेळाडू

एमपीसी न्यूज : अण्णासाहेब नातू यांच्या (Pune) स्मृतिनिमित्त पुना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशन तर्फे अण्णासाहेब नातू चॅम्पियन्स प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे. या प्रोजेक्टद्वारे 13 ते 17 वर्षातील बॅडमिंटन खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरिता पुल्लेला गोपीचंद व प्रकाश पदुकोण ह्यांच्या अकादमींशी बोलणी झाली असून या खेळाडूंना प्रशिक्षणासाठी इतर देशात जाण्याची संधीही असोसिएशन तर्फे देण्यात येणार असून त्याचा सर्व खर्च असोसिएशन करणार असल्याची माहिती अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी यावेळी दिली.

तसेच या खेळाडूंना भारतातील स्पर्धांमध्ये भाग घेण्याकरता प्रवास व इतर खर्च ही संघटना करणार आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट पुण्यातून जास्तीतजास्त राष्ट्रीय विजेते तयार करणे हे असेल! ह्या प्रकल्पा करता अमनोरा समूहाने 3 वर्षे रुपये 10 लाख इतके सहाय्य देण्याचे मान्य केले आहे.

पुना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशनच्या माध्यमातून असोसिएशनचे माजी तहहयात अध्यक्ष सदाशिव उर्फ अण्णासाहेब नातू यांनी केवळ बॅडमिंटनपटूच घडविले नाही, तर या खेळासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले होते. त्यांच्या विविध संकल्पना आणि सुविधांमुळे आज बॅडमिंटनला सोन्याचे दिवस आले आहेत. अण्णासाहेब नातू यांचे बॅडमिंटनसाठी भरीव योगदान कधीही विसरता येणार नाही. अशी भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली.

पुना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशन तर्फे अण्णासाहेब नातु यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या श्रद्धांजली सभेमध्ये पुना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, बॅडमिंटनपटू व संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष शशांक हळबे, अण्णासाहेबांचे बालपणापासूनचे मित्र व ज्येष्ठ चिकित्सक डॉ. प्रकाश जोशी, बॅडमिंटन प्रशिक्षक अनिल मोडक, राष्ट्रीय पंच हेमंत खाडिलकर, त्यांचे किर्लोस्कर कमिन्स मधील सहकारी विजय पंडित, पालक प्रतिनिधी म्हणून नितीन भिवपाठकी, आंतरराष्ट्रीय पंच गिरीश नातू, अण्णासाहेबांचे चिरंजीव व संघटनेचे महासचिव रणजीत नातू, अभय सोनावणे आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अण्णासाहेब नातू यांच्या आठवणींना उजाळा दिला. अण्णासाहेबांच्या नातवंडांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.

Pimpri : मराठी पत्रकार परिषदेच्या आरोग्य शिबिराचा घेतला अनेकांनी लाभ

अनिरुद्ध देशपांडे म्हणाले अण्णासाहेब नातू यांच्यामुळे बॅडमिंटनची चांगली पायाभरणी झाली. अनेक चांगले खेळाडू (Pune) त्यांच्यामुळे घडले. बॅडमिंटनला आज जे चांगले दिवस दिसत आहेत त्याचे श्रेय आपण अण्णासाहेब नातू यांच्या प्रयत्नांना दिले पाहिजे.

गिरीश नातु म्हणाले, अण्णासाहेब नातु हे कायम प्रत्यक्ष काम करण्यावर भर देत असत. त्यांनी केवळ चांगले खेळाडू घडविले नाही तर चांगले व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी त्यांचा कायम प्रयत्न असायचा. त्यामुळे त्यांनी घडवलेल्या व्यक्तींनी केवळ खेळातच नव्हे तर समाजामध्ये चांगले काम करण्यासाठी हातभार लावला आहे.

रणजीत नातु म्हणाले, अण्णासाहेब नातु यांच्या डोक्यामध्ये 24 तास बॅडमिंटन हाच खेळ असायचा. बॅडमिंटनसाठी त्यांनी आपले जीवन वाहून घेतले होते. त्यांनी केलेल्या विविध सुधारणा आणि कार्य बॅडमिंटन क्षेत्र कधीही विसरू शकणार नाही. नॅशनल चॅम्पियन्सला रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्याची संकल्पना, राष्ट्रीय संघटनेकडून झालेल्या विरोधाला न जुमानता त्यांनीच पहिल्यांदा 1997 मध्ये पुण्यात सुरू केली. त्यांच्यामुळेच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले आहेत त्याचे श्रेय आपण अण्णासाहेब नातू यांना दिले पाहिजे.

सभेचा शेवट त्यांच्या स्नुषा व प्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉ. रेवा नातू ह्यनी अण्णासाहेबांच्या आवडत्या भजनांचे गायन करुन केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.