Pune : ‘ब्राह्मण रत्ने’ या 1200 पानांच्या चरित्रकोश ग्रंथाचे प्रकाशन

आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका तर्फे कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज : आज महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय स्थिती (Pune)जातीपातीमुळे विस्कटत चालली आहे. संत – महंतांनी जातीची जी विण विणली होती, ती आता विस्कटत आहे. प्रबोधन आणि विकासामुळे मनातून गेलेली जात ही केवळ स्वार्थाच्या राजकारणामुळे पुन्हा वर येत आहे, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका तर्फे (Pune) मागील सुमारे 225 वर्षांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणा-या कर्तृत्त्ववान अशा 700 हून अधिक राष्ट्रकायार्साठी समर्पित ब्राह्मण व्यक्तिमत्वांचा समावेश असलेला 1200 पानांचा ‘ब्राह्मण रत्ने’ हा चरित्रकोश ग्रंथ साकारण्यात आला आहे. बालगंधर्व रंगमंदिरात ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.

Pune – ‘पूनावाला दांपत्याला सामाजिक नवनिर्मितीचा ध्यास ‘ : डॉ.बाबा आढाव

यावेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, माजी आमदार मेधा कुलकर्णी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ग्रंथाच्या संपादक मंडळाचे सदस्य असलेले ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर, प्रकल्प संचालक गोविंद हर्डीकर, संजय ओर्पे व ग्रंथाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. श्रीमंत पेशवे घराण्याचे वंशज आणि लोकमान्य टिळकांचे वंशज यांचा कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, जातीपातीचे राजकारण थांबवण्यासाठी आपण सर्वांनी जातीच्या वर येत सगळ्यांचा विकास ही ईश्वराची पूजा आहे, असा विचार करायला हवा. या प्रयत्नात आपण कमी पडलो तर खूप कटुता निर्माण होईल.
परमेश्वराने आपल्यामध्ये भेद निर्माण केला नाही. सगळ्यांना एकसारख्याच पद्धतीने पाठवले. परंतु वेगळेपणा आणि भेद आपण निर्माण करून आपण परमेश्वरापेक्षा पण मोठे निघालो. मनामध्ये जाती विषय कोणताही न्यूनगंड निर्माण न करता विकासाच्या कामात सहभागी व्हावे. दखल न घेतल्यामुळे मुले परदेशी जातात, असा एकूण भाव पाहायला मिळतो, परंतु असे करणे हे विकासाला अडसर ठरेल. त्यामुळे येत्या काळात मोठ्या मनाची भूमिका घ्यायला पाहिजे. आपल्या विकासातील जाती व्यवस्थेचा अडसर दूर करायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

अविनाश धर्माधिकारी म्हणाले, राजकीय स्वार्थामुळे पद्धशीरपणे ब्राह्मण द्वेष पसरविला जातो. फुले , शाहू आंबेडकरांचे नाव महाराष्ट्रात घेतले जाते, परंतु त्यांच्या सोबतचे अनेक जण ब्राह्मण होते. आताच्या भारत आणि महाराष्ट्रामध्ये जाणून बुजून एका विशिष्ट वैचारिक समीकरणाची जोपासना केली जाते. हिंदू द्वेष म्हणजे सेक्युलर वाद आणि ब्राह्मण द्वेष म्हणजे पुरोगामित्व. अशावेळी तर्कशुध्द अभ्यास करून सगळ्यांना सोबत घेऊन जाणे, असे ब्राम्हण समाजाने पुढे जायला पाहिजे. तर्कशुध्द विचारांनी सत्य सांगितले तर द्वेषाचा पराभव होईल. ब्राह्मण असणे ही शुद्ध सात्विक चारित्र्याची जोपासना आहे. त्यामुळे समाजाचे कल्याण होईल.

शंकर अभ्यंकर म्हणाले, ब्राह्मण एकांडे शिलेदार यासारखे काम करतात. परंतु यातून धडा घेऊन संघटनांच्या माध्यमातून काम करायला हवे. संपूर्ण पृथ्वी एका घरासारखी असेल तर विश्र्वरूपी घराला भारत रुपी मंदिर ज्यांनी दिले, त्यातील सिंहाचा वाटा ब्राह्मणांचा आहे. परंतु अनेक ठिकाणी ब्राह्मणांचा द्वेष केला जातो. महाराष्ट्रात ब्राह्मणांची स्थिती इतकी वाईट आहे की ज्यू सारखी ब्राह्मणांची स्थिती होईल का? असा विचार मनात येतो.

राहुल सोलपूरकर म्हणाले, यशाच्या काही हजार कोटी आकड्यांना पर्यंत पोहोचणाऱ्या एकही ब्राह्मणाने एकदाही सोय, सवलत आणि आरक्षण मागितले नाही. वर्षानुवर्षे निंदा, नालस्ती, उपेक्षा विशेषकरून राजकीय कारणासाठी समाजाचा उपयोग या सगळ्यातून ब्राह्मण वर्ग उठून उभा राहिला पाहिजे. जात धर्म विसरून ब्राह्मण समाजाने समाजाला एकत्र केले. त्याचप्रमाणे राष्ट्र उत्थानासाठी एकत्र यावे.

यावेळी ग्रंथासाठी विशेष सहकार्य देणारे ब्राह्मण उद्योजक उपस्थित होते. त्यामध्ये चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे, पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई, बेलराईज इंडस्ट्रीजचे श्रीकांत बडवे व सुप्रिया बडवे, श्री धूतपापेश्वरचे रणजित पुराणिक, साण्डू ब्रदर्सचे शशांक साण्डू, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे पराग गाडगीळ, युवा उद्योजक प्रशांत कारूळकर, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, वामन हरी पेठे ज्वेलर्सचे विश्वनाथ पेठे, गोदावरी अर्बनचे धनंजय तांबेकर, प्रावी आॅटोचे रवींद्र देवधर, अमेय इंडस्ट्रीजचे अतुल परचुरे, बुलडाणा अर्बनचे शिरीष देशपांडे, पीएनजी अँड सन्सचे अजित गाडगीळ, लोकमान्य मल्टिपर्पजचे किरण ठाकूर, ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक आदी उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.