Pune – ‘पूनावाला दांपत्याला सामाजिक नवनिर्मितीचा ध्यास ‘ : डॉ.बाबा आढाव

एमपीसी न्यूज – सामाजिक चळवळीतील (Pune) ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. झैनब पूनावाला यांच्या सामाजिक योगदानाला पुण्यात झालेल्या स्मरणांजली कार्यक्रमात मान्यवरांनी उजाळा दिला.

युनिव्हर्सिटी वूमेन्स असोसिएशन सभागृह येथे झालेल्या या स्मरणांजली सभेला (Pune) पूनावाला परिवार, त्यांची मुलगी वास्तुविशारद शबनम पूनावाला, त्यांची नात सना वैद्य, डॉ.बाबा आढाव, अन्वर राजन, प्रा.शमसुद्दीन तांबोळी, पुष्पा हेगडे, श्यामला देसाई, डॉ.मेहता, मोहिते तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पूनावाला यांचे वयाच्या 91 व्या वर्षी 8 ऑक्टोबर 2023 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले होते.बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीचे आघाडीचे नेतृत्व,सामाजिक कृतज्ञता निधीच्या कामात सक्रिय कार्यकर्ते ताहेरभाई पूनावाला यांच्या डॉ. झैनब या पत्नी होत्या.

Pimpri : शहरी वाहतुकीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पिंपरी महापालिकेला प्रथम पारितोषिक

इंडीयन फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी वुमेन्स असोसिएशन च्या समन्वयक म्हणून डॉ. झैनब यांनी काम पाहिले. त्या दाउदी बोहरा समाजातील पहिल्या फळीतील डॉक्टरेट प्राप्त संशोधक महिला होत्या. त्या मॉडेल कॉलनी सुधारणा परिसर सुधारणा समितीच्या संस्थापक होत्या.नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज या संस्थेशी ही त्या संबंधित होत्या.डॉ. झैनब यांनी ताहेरभाई यांच्यासमवेत बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीत उल्लेखनीय काम केले.

सामाजिक कृतज्ञता निधी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी यांसह विविध परिवर्तनवादी संस्थांच्या कार्यातही त्यांचा सकिय सहभाग होता. या सर्व योगदानाला उजाळा देण्यात आला.

डॉ. झैनब पूनावाला यांच्या अंतिम इच्छेनुसार देहदान करण्यात आले होते. वैद्यकीय संशोधनासाठी त्यांचा देह वैद्यकीय महाविद्यालयास सुपूर्द करण्यात आला, याचाही उल्लेख वक्त्यांनी केला.

डॉ. झैनब पूनावाला यांच्या उत्कृष्ठ संघटक, दानशूर व्यक्ती, प्रेमळ, निडर सामाजिक कार्यकर्ती अशा अनेक पैलूंना वक्त्यांनी उजाळा दिला.

डॉ. बाबा आढाव म्हणाले, ‘पूनावाला कुटुंब हे सामाजिक नवनिर्मिती चा ध्यास घेतलेले कुटुंब होते. देश आणि राज्यातील विचारवंत, कार्यकर्ते यांचे हक्काचे घर होते. सामाजिक बंडखोरी करताना ते ठाम राहिले. सनातनीपणा नको, आधुनिकता हवी, हा मानवी विचार त्यांनी जपला. आंतरभारती, सामाजिक कृतज्ञता निधी सारख्या संस्थांशी ते जोडले होते. डॉ. झैनब यांनी ताहेरभाईंना खंबीर साथ दिली.त्यांचे दोघांचे योगदान लक्षात घेऊन विचार पुढे नेऊन समाजाची जडण घडण कशी होईल, हे पाहिले पाहिजे.

अन्वर राजन म्हणाले, ”बहिष्कार असतानाही पूनावाला कुटुंब आनंदाने जगले. सामाजिक तणावाचा ताण घरात आणला नाही.व्यापक मानवतावादी भूमिका त्यांनी घेतली. कोणताही कडवटपणा या दांपत्याने घेतला नाही. ठाम आणि आनंदी राहून आपली सामाजिक भूमिका विकसित करत कसे जावे, हे सामाजिक कार्यकर्त्यांनी शिकले पाहिजे.

मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी म्हणाले, ” पूनावाला कुटुंब हे महात्मा फुले आणि संविधानाच्या स्वप्नातील कुटुंब होते, अनेक कार्यकर्त्यांसाठी ते आधारवड होते. हमीद दलवाई आणि ताहेरभाई यांच्यातील मानवता, धर्मनिरपेक्षता हे साम्य आहे. झैनब पूनावाला या सावित्री – फातिमाची लेक शोभावी असेच आयुष्य त्या जगल्या.

एक समर्पित आयुष्य जगल्या नंतर आपला मृत्यू ही तसाच असावा, मानवता वृध्दिंगत करणारा ठरावा म्हणून त्यांनी शिक्षण आणि संशोधनासाठी मरणोत्तर देहदान केला. या सभेला श्रध्दांजली सभा किंवा शोक सभा न म्हणता ” डॉ. झैनब पूनावाला यांचे आयुष्य आणि आनंद समारंभ ” असे शीर्षक देण्यात आले होते.

त्याची नात सना आणि मुलगी शबनम यांनीही विविध आठवणींना उजाळा दिला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.