IND vs ENG : बुमराह, शमीच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचा डाव गडगडला, 27 षटकात 6 बाद 94

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) : बुमराह, शमीच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचा डाव गडगडला असून 27 षटकात 6 बाद 94 अशी दैन्यावस्था झाली आहे. 

या स्पर्धेत आतापर्यंत एकही (IND vs ENG) सामना न हारणाऱ्या IND vs ENG भारतीय संघाला अंकतालिकेत शेवटच्या स्थानावर असलेल्या इंग्लंड संघाने 229 धावांवर रोखून सुरुवातीला तरी चांगली कामगिरी करत भारतीय संघाला आज काहीअंशी रोखण्यात यश मिळवले आहे,पण ही कामगिरी उलटफेर करणारी असेल की भेदक भारतीय गोलंदाजी या धावसंख्येला शाबूत ठेवेल याचे उत्तर थोड्याच वेळात कळेल.

आतापर्यंत या स्पर्धेत अजिंक्य असणाऱ्या आणि यजमान (IND vs ENG) असलेल्या भारतीय संघाची आजची आणि या विश्वकप स्पर्धेतली सहावी लढत अंकतालिकेत शेवटच्या स्थानावर असलेल्या इंग्लंड संघाविरुद्ध लखनऊ येथील अटलबिहारी वाजपेयी मैदानावर लढली गेली ज्यात इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.दोन्हीही संघाने आपला आधीच्या सामन्यातलाच संघ कायम ठेवला.

Moshi : भावी पिढीला ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटातून वाचण्यासाठी ‘ग्रीन सोसायटी’चाच पर्याय – अजित गव्हाणे

भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. एका बाजूने रोहित त्याच्या चिरपरिचित शैलीत खेळत असतानाच युवा पण प्रतिभावंत गील,ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर फक्त 9 धावा काढून त्रिफळाबाद झाला,यानंतर आलेल्या कोहलीने आपल्या शानदार फॉर्ममुळे खूप अपेक्षा निर्माण केल्या होत्या, पण आज तो अतिशय खराब फटका मारुन भोपळा न फोडताच बाद झाला.पहिले 8 चेंडू खेळूनही त्याला धाव काढता आली नाही, कदाचित ते दडपण झुगारून देण्याच्या प्रयत्नात तो एक खराब फटका मारुन बाद झाला. विशेष बाब म्हणजेकोहली वर्ल्डकप मध्ये पहिल्यांदा शुन्यावर बाद झाला.

यानंतर आलेल्या अय्यरनेही अतिशय बेजबाबदार खेळ करत एक खराब फाटक मारुन केवळ 4 धावा काढून तंबूत परतत संघाला आणखीनच अडचणीत आणले.आखूड टप्प्याच्या चेंडूवर त्याची होणारी घाबरगुंडी आजही पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवली. खरे तर कर्णधार म्हणून आपला 100 वा सामना खेळत असलेल्या रोहित शर्माचा यावेळी चांगलाच आक्रमक अंदाज दिसत होता, यावेळी त्याला अय्यरने फक्त योग्य ती साथ देणे अपेक्षित होते ,पण अय्यरने ना आपली जबाबदारी ओळखली ना संघाला सावरण्यात खिंड लढवली. यावेळी भारतीय संघ पूर्णपणे अडचणीत सापडला होता.३ बाद 40 अशा कठीण परिस्थितीत संघ सापडला असताना मैदानात उतरला तो के एल राहुल.

त्याने मात्र यावेळी अतिशय जबाबदारीने खेळत कर्णधाराला साथ द्यायला सुरुवात केली आणि भारतीय संघ हळूहळू सावरायला लागला.खरे तर यावेळी नशीबही भारतीय संघाच्या बाजूने साथ देत होते. तुफानी अंदाजात खेळत असलेल्या रोहितलाही वुडने वैयक्तिक 33 धावांवर असताना पायचीतचे केलेले अपील पंचांनी ग्राहय धरत त्याला बाद ही दिले होते ,पण रोहितने डी आर एसचे केलेले अपील त्याला जीवदान देऊन गेले, त्यानंतर रोहितने अतिशय शानदार खेळ करत थोड्याच वेळात आपले 54 वे अर्ध शतक पूर्ण केले.

याचवेळी त्याने या वर्षात सर्वाधिक 56 सिक्स, मारत द युनिव्हर्सल बॉस म्हणून क्रिकेट विश्वात परिचित असलेल्या गेलच्या विक्रमाची बरोबरी केली,या यादीत त्याच्यापुढे आता फक्त ए बी डिविलीयर्स आहे(2018 सालात 58 षटकार),आणि तो विक्रम त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी फक्त दोनच षटकार हवे आहेत.के एल राहूलने,रोहितला अतिशय सुंदर साथ देत चौथ्या गड्यासाठी 91 धावांची महत्वपूर्ण भागीदारी करुन संघाला संकटातून बाहेर काढण्यासाठी चांगलीच कामगिरी केली.

 

दोघेही उत्तम खेळत होते आणि संघाला मोठ्या धावसंख्येची आशा दाखवतच होते की जम बसलेल्या के एल राहुलचा संयम अचानक संपला आणि तो सुध्दा एक खराब फटका मारूनच विलीच्या गोलंदाजीवर 39 धावांवर असताना बेअरस्टोच्या हातात झेल देवून बाद झाला.यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आलेली निराशा खूप काही सांगून गेली.यानंतर मैदानात उतरला तो टी-20 चा मिस्टर 360 म्हणून ओळखला जाणारा सुर्यकुमार यादव. त्याने कर्णधाराला साथ देत संघाला सावरायला सुरुवात केली.

दुसऱ्या बाजूने एवढ्या पडझडीतही रोहित या खतरनाक आणि फलंदाजीसाठी जणू वैरीण वाटत असलेल्या खेळपट्टीवर एक अतिशय शानदार खेळी करत होता. कदाचित या विश्वकप स्पर्धेतली रोहितची ही सर्वोत्तम खेळी ठरावी. तो आपल्या एकूणच दर्जाला साजेशी पण प्रतिमेच्या विरुद्ध खेळ करून संघासाठी “captains leads from the front”या उक्तीला साजेशी खेळी करत होता.

याअगोदरच विश्वकप स्पर्धेत सर्वाधिक 7 शतकांचा विक्रम आपल्या नावावर करणारा रोहित आजही शतक करुन हे 8 वे शतक यादगार करेल असे वाटत असतानाच या सुंदर खेळीचा त्यानेच एक खराब फटका मारून घात केला. रोहितचे शतकच काय तो आज बाद सुद्धा होणार नाही असे वाटत असतानाच त्याने स्वतःच या सुंदर स्वप्नाचा भंग केला.

विराट आणि रोहित मध्ये हाच फरक आहे की शतकाजवळ आलेल्या विराटला शतक पूर्ण करता येते,तर रोहित आपल्याच हाताने आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेतो, कदाचित म्हणूनच विराट 49 व्या शतकाच्या उंबरठ्यावर आहे आणि रोहितचे 31 च शतके आहेत. आकडेवारी सर्वच सिध्द करत नसते हे मान्य केले तरीही रोहितची ही सवय त्याला आजच्या काळातला एकदिवसीय क्रिकेटमधला सर्वोत्तम असूनही तसे होवू देत नाही.

यावेळी भारतीय संघ दोनशे धावा तरी गाठेल की नाही असे वाटत असतानाच सुर्यकुमारने अतिशय जबाबदारीने खेळत 49 धावांची बहुमूल्य खेळी करत संघाला दोनशेचा टप्पा गाठून दिला. तो रंगात येतोय असे वाटत असतानाच तो 49 धावांवर असताना एक उत्तुंग फटका मारण्याच्या नादात बाद झाला आणि तो खेळत असताना 250 धावा सहज करेल असेम वाटणाऱ्या आशेलाही सुरुंग लागला.पण कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराने अखेरच्या षटकात साहसी फटके मारत संघाला 229 धावांची सन्मानजनक मजल मारून दिली. या खेळपट्टीवर या धावा नक्कीच लढण्यासाठी पुरेशा वाटत होत्या. इंग्लंड संघाकडून वेगवान गोलंदाज विलीने सर्वाधिक 3 तर आदिल रशीद व वोक्सने प्रत्येकी दोन दोन गडी बाद केले.

उत्तरादाखल खेळताना माजी विश्वविजेते असलेल्या पण या वर्षीच्या विश्वकप स्पर्धेत अतिशय निराशाजनक खेळ करणाऱ्या इंग्लंड संघाच्या डावाची सुरवात अतिशय सनसनीखेज झाली.जॉनी बेअरस्टो आणि डेविड मलान जोडीने पहिल्या 4.5 षटकात 30 धावांची स्फोटक सलामी देत प्रतीआक्रमण केलेच होते की संघाचे ब्रह्मस्त्र असणाऱ्या जसप्रित बुमराहने 5 व्या षटकाच्या 5 व्या चेंडुवर प्रथम मलानला त्रिफळाबाद करत तर पुढच्याच चेंडूवर जो रूटला गोल्डन डकवर पायचीत करून इंग्लिश संघाच्या गोटात एकच खळबळ उडवून दिली.यावेळी मैदानावर उपस्थित असणाऱ्या 30 हजारांहून अधिक भारतीय चाहत्यांनी एकच जल्लोष करत इंग्लिश संघाला त्यांच्यापुढे काय वाढून ठेवले आहे.

याचाच जणू ईशान दिला. बुमराह यावेळी हॅट्ट्रिकवर होता, पण स्टोक्सने ते स्वप्न साकार होवू दिले नाही.फक्त वर्ल्डकप साठी संघात घेतलेल्या बेन स्टोक्सवर इंग्लिश संघाच्या सर्व अपेक्षा शिल्लक असतानाच मोहम्मद शमीने त्यालाही शुन्यावरच त्रिफळाबाद करत इंग्लंड संघाला मोठा हादरा दिला ,यात आणखी एका विकेटची भर पडलीच होती,पण कोहलीच्या हातून झेल सुटला, पण त्याचे दुःख शमीने लगेच विसरायला लावताना बेअरस्टोला त्रिफळाबाद करुन इंग्लंड संघाची अवस्था 4 बाद 39 अशी भयंकर करुन टाकली.

आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत स्वतःला कित्येकदा सिद्ध करुनही संघाचा अविभाज्य घटक न मानला गेलेल्या शमीने दोन शानदार चेंडूवर दोन महत्वपूर्ण विकेट्स घेत आजही संघव्यवस्थापणाला आपण काय आहोत हे सिध्द करुन दाखवताना महान खेळाडूचे तोंड नाही तर त्यांची कामगिरी बोलत असते हेच सिद्ध केले.
हे वृत्त लिहिपर्यंत इंग्लंड संघाची अवस्था 12 षटकात 4 बाद 42 अशी नाजूक झाली होती.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.