Pune News : डॉक्टरांच्या संरक्षक विधेयकाची अंमलबजावणी व्हावी-सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज – “कोरोना काळात डॉक्टर आणि शेतकरी यांनी ईश्वरी कार्य केले. अशा डॉक्टर, रुग्णालयावर होणारे हल्ले चिंतेची बाब आहे. डॉक्टरांना संरक्षण (Pune News) देणारे विधेयक गेल्या अनेक वर्षांपासून संसदेत प्रलंबित आहे. केंद्र सरकारने हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करण्याची मागणी सातत्याने करत आहोत,” असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
हल्ला आणि कायद्यापेक्षा संवाद व सामंजस्याची भाषा अधिक प्रभावी असते, असेही त्यांनी नमूद केले.आयुर्वेद, ऍलोपॅथी आणि तंत्रज्ञानाच्या संगमातून डॉ. कामठेज् पाईल्स क्लिनिक या सर्जिकल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे मूळव्याध, भगंदर, फिशर, फिस्तुला यांसारख्या मलमार्गाशी संबंधित आजारावर अत्याधुनिक लेजर उपचार व संशोधन केंद्राचे उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. डॉ. कामठेज् पाईल्स क्लिनिकचे प्रमुख डॉ. कुणाल कामठे व डॉ. शर्मिला कामठे यांच्या पुढाकारातून गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, आयुर्वेदिक क्षारकर्म, क्षारक्रिया एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
इंद्रप्रस्थ लँडमार्क, कोंढवा येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, आमदार चेतन तुपे, सुश्रुत हॉस्पिटलचे डॉ. शिवकुमार गोरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. प्रताप परदेशी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई आदी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “डॉक्टरांवर हल्ला करणे हा उपाय नाही. अन्याय झाला असल्यास संवादातून, कायद्याच्या मार्गाने दाद मागायला हवी. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आरोग्य सेवा सुलभ व अत्याधुनिक होत आहेत. कामठे दाम्पत्य आयुर्वेद, ऍलोपॅथी व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अशा अवघड (Pune News) आजारांवर उपचार देत आहे. सर्व सोयींनी, अत्याधुनिक यंत्रणांनी युक्त असे हे संशोधन केंद्र आहे. श्रद्धा-अंधश्रद्धा यातील भेद ओळखून विज्ञान व संशोधनाचा मार्ग अवलंबल्यास देश आणखी वेगाने प्रगतीपथावर जाईल.”
प्रास्ताविकात डॉ. कुणाल कामठे म्हणाले, “आयुर्वेदाला तंत्रज्ञानाची जोड देत मलमार्गाशी संबंधित व्याधींवर उपचार देत आहोत. फिरते मूळव्याध क्लिनिक उपक्रमातून गोरगरीब रुग्णांना दर आठवड्याला मोफत तपासणी व उपचार दिले जातात. क्षारसुत्र व क्षारकर्म पद्धतीने हजारो शस्त्रक्रिया केल्या आहेत. 2019 मध्ये 208 रुग्णांवर 11 तासांत मोफत शस्त्रक्रिया करून जागतिक विक्रम नोंदवला होता. हॉस्पिटल आणि मंगल फाउंडेशनच्या सहकार्याने विविध सामाजिक कार्य वर्षभर सुरू असते.”
चेतन तुपे यांनीही मनोगत व्यक्त केले. विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शर्मिला कामठे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.