Pune News : अंथरुणावर खिळलेल्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम : महापौर मोहोळ

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेमार्फत कोविड काळात विविध ठिकाणी, विविध घटकांसाठी मोफत लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली आहे. त्यामध्ये आता अंथरुणावर खिळलेल्या आणि शारीरिक हालचाल न करता येणाऱ्या व्यक्तींसाठी पुणे महापालिका लसीकरण मोहीम राबवत आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

ज्या व्यक्ती अंथरुणावर खिळलेल्या आहेत. पुढील सहा महिने त्यांची परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता आहे. त्यांना लस द्यावयाची असेल, अशा व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी पुणे महापालिका विशेष मोहीम राबवत आहे.

याबाबत महापौर मोहोळ म्हणाले, ‘प्रत्येक पुणेकराला लस देण्याचा आपला प्रयत्न असून अंथरुणावर खिळलेला घटक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी आम्ही विशेष उपक्रम राबवत आहोत. ज्यांचे कुटुंबीय अंथरुणावर खिळलेल्या अवस्थेत आहेत, अशा नागरिकांना लस हवी असणाऱ्या व्यक्तींचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळून बसण्याचे कारण, सदरची व्यक्ती लसीकरण करून घेण्यास पात्र असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ञांचे प्रमाणपत्र तसेच व्यक्तीच्या जवळचे नातेवाईक किंवा काळजी घेणाऱ्या व्यक्तीने संदर्भातले संमतीपत्र [email protected] या ई-मेलवर पाठवावे.

सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पात्र ठरलेल्या व्यक्तींना त्यांच्या दिलेल्या घरच्या पत्त्यावर लसीकरणाची तारीख आणि वेळ कळविण्यात येईल.’

‘लसीकरण करताना आणि लसीकरणानंतर व्यक्तीचे तीस मिनिटे निरीक्षण करण्यासाठी फॅमिली डॉक्टर उपस्थित असणे अपेक्षित आहे. या मोहिमेमार्फत रुग्णांना कोवॅक्सिन लसीचा डोस देण्यात येणार आहे. पुणे महापालिकेमार्फत सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की, ज्या व्यक्ती अंथरुणाला खेळून बसलेल्या आहेत आणि ज्यांना लस घ्यायची आहे अशा व्यक्तींनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे महापौर मोहोळ म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.