Pune : पद्मभूषण डॉ. सायरस पूनावाला यांना स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात मोलाचे योगदान (Pune) दिल्याबद्दल 2024 चा ‘स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ पद्मभूषण डॉ. सायरस पूनावाला यांना जाहीर झाला असून स्व. धारिया यांच्या जयंतीदिनी, 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.45 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात हा सोहळा संपन्न होणार आहे.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असून कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाशजी मिश्रा सन्माननीय अतिथी आहेत. वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी आज पुरस्काराची घोषणा केली.
यंदा डॉ. मोहन धारिया यांची 99 वी जयंती असून पुढील वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचे ‘जन्मशताब्दी वर्ष’ साजरे केले जाणार आहे.

आपल्या विशिष्ट कार्यक्षेत्रातून भारताच्या विकासात मुलभूत योगदान देणाऱ्या समाजातील जेष्ठ व्यक्तींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ‘डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ देण्यात येतो. एक लक्ष रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ व मानचिन्ह असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराची संकल्पना ‘वनराई’चे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी यांची असून, त्यांच्या पुढाकारातून हा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून अव्याहतपणे सुरु आहे.

यावर्षीचा पुरस्कार लशीकरणाच्या क्षेत्रातील अद्वितीय योगदानाबद्दल डॉ. सायरस पूनावाला यांना प्रदान करण्यात येईल. लशीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाची दखल घेत ‘वनराई फाउंडेशन’ने डॉ. सायरस पूनावाला यांची (Pune) स्व.डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कारासाठी एकमताने निवड केली असल्याची माहिती रवींद्र धारिया यांनी दिली.

Hinjawadi : गुंतवणुकीच्या बहाण्याने लोकांना लाखोंचा गंडा घालणारा ठग गजाआड

धारिया म्हणाले की, डॉ. पूनावाला यांनी “परवडणाऱ्या लशीतून सर्वांसाठी आरोग्य” हे ब्रीद नजरेसमोर ठेऊन 1966 मध्ये ‘सिरम इन्स्टिट्यूट’ ची स्थापना केली आणि याद्वारे विविध आजारांवर उपाय ठरणाऱ्या जीवरक्षक लशींचे उत्पादन करण्यास सुरुवात केली. रोगप्रतिबंधक लशीद्वारे जगभरातील 30 दशलक्षांहून अधिक मानवी जीव वाचवणारी जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी म्हणून आज सिरम इन्स्टिट्यूट ओळखली जाते. ‘कोविड’ महामारीमध्ये ‘सिरम’ ने विकसित केलेली लस भारतासह अनेक देशांसाठी वरदान ठरली. डॉ. पूनावाला यांच्या या प्रेरणादायी कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात येत असल्याचा विशेष आनंद होत आहे.

वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, डॉ. गिरीश गांधी, नितीनभाई देसाई, रोहिदास मोरे, गणपतराव पाटील, सागर धारिया, सचिव अमित वाडेकर, समीर सराफ, अनंत घारड, डॉ.पिनाक दंदे, अजय पाटील, निलेश खांडेकर, अनिल राठी, अॅड्. निशांत गांधी व समस्त वनराई परिवार पुरस्कार सोहळ्यास उपस्थित असणार आहे.

क्रांतिकारी, स्वातंत्र्यसेनानी, धोरणकर्ते, समाजसुधारक, पर्यावरणवादी आणि लोकप्रिय नेते अशी प्रतिमा असलेल्या डॉ. मोहन धारिया यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातही देशहितासाठी भरीव योगदान देत रचनात्मक कार्याचा पाया रोवला. खासदार, केंद्रीय मंत्री, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि ‘वनराई’ संस्थेचे संस्थापक अशा विविध भूमिकेतून त्यांनी सुमारे 70 वर्षे देशसेवा केली. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि राष्ट्रीय एकात्मता या नीतीमूल्यांवर आधारित विचारधारेतून आणि ठाम भूमिकेतून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात आपला ठसा उमटवला.

तसेच ‘वनराई’सह विविध स्वयंसेवी संस्था-संघटनांच्या माध्यमातून जलसंधारण, वनीकरण, पर्यावरण, ग्रामीण विकास इत्यादी क्षेत्रांत मूलभूत योगदान दिले. या क्षेत्रांतील अनेक शासकीय धोरणांचे ते शिल्पकार ठरले. ग्रामीण भागाला दुष्काळमुक्त करण्यासाठी त्यांनी “गाँव का पानी गाँव में, खेत का पानी खेत में” ही संकल्पना मांडली. वनीकरणासाठी जनआंदोलनाचा नारा दिला. भारताला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले. देशातील 7 हजार स्वयंसेवी संस्थांची संघटना त्यांनी स्थापन केली. त्यांच्या योगदानाबद्दल पदमविभूषण पुरस्कारासह, दोन डी.लिट. पदव्या तसेच अनेक प्रतिष्ठेचे मान-सन्मान प्राप्त झाले. त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याला समर्पित ‘डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ ‘वनराई फाउंडेशन’तर्फे प्रदान करण्यात येतो.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.