Pune : पोलिसांनी हटवला संभाजी महाराजांचा ‘तो’ पुतळा

एमपीसी न्यूज- संभाजी उद्यानात काही व्यक्तींकडून बसवण्यात आलेला संभाजी महाराजांचा पुतळा पोलिसांनी तेथून हटवला. सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींकडून संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्याचे आज, मंगळवारी सकाळी उघडकीस आले. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांनी त्वरित परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवून पुतळा या ठिकाणाहून हलवला.

काल, सोमवारी मध्यरात्री अचानक काही जणांनी या चौथऱ्यावर संभाजी महाराजांचा एक छोटा पुतळा नेऊन ठेवला. त्याचप्रमाणे पुतळा इथं नेऊन ठेवणाऱ्या गणेश कारले नावाच्या तरुणाने त्या पुतळ्यासोबत सेल्फी घेतला आहे. हा पुतळा इथून हलवल्यास गंभीर परिणाम होतील असा आशय असलेला मजकूर लिहिलेला कागद या चौथऱ्यावर चिकटवण्यात आला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांची धावपळ उडाली. त्वरित या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी पुतळा येथून हलवला. दोन वर्षांपूर्वी संभाजी ब्रिगेडकडून याच उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.