Pune : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कर्तृत्ववान युवक आणि युवतींचा सन्मान

एमपीसी न्यूज- स्वामी विवेकानंदाच्या जयंती निमित्त अर्थात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या कर्तृत्वान सात युवक आणि युवतींना गौरविण्यात आले. स्वप्नील दुधाणे (कोथरूड विधानसभा अध्यक्ष) आणि सनी मानकर (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग, पश्चिम विभाग) यांच्या हस्ते पुरस्कारार्थींचा सन्मान झाला.

या उपक्रमांतर्गत रफिक जमादार, किरणकुमार कोरे, विपुल साळुंखे, अमोल कांगणे, प्रेरणा चव्हाण, कोमल बन्सल आणि आसमी जैन या सात जणांना मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

रफिक जमादार हे ‘एडीजीपीआय इंडियन आर्मी अँड नॅशनल डिफेन्स’मध्ये कार्यरत असून, राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधील तरुण प्रशिक्षणार्थी आहेत. किरणकुमार कोरे याने श्रीलंकेत झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत भारताचं नेतृत्व करून लावणीसाठी सुवर्णपदक मिळवले आहे. तसेच “छत्रपती शासन” या चित्रपटात लावणी सादर करून किरण कोरे हा चित्रपटात लावणी करणारा पहिला मुलगा ठरला.

विपुल साळुंखे कलाकार, मॉडेल आणि चित्रपट निर्माता आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेद्वारे ते प्रचलित आहेत. अमोल कागणे यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाले असून, येत्या वर्षात ‘अमोल कागणे फिल्म्स’ या एकाच प्रोडक्शन हाऊसचे तब्बल ६ मराठी चित्रपट घेऊन ते येणार आहेत, ही मराठीतील पहिलीच घटना आहे. प्रेरणा चव्हाण या सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर असून, अत्यंत कमी वयात त्यांनी अनेक पुरस्कार पटकाविले आहेत. डॉ. कोमल बन्सल यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष काम केले आहे. प्राणीमित्र आसमी जैन यांनी एका वर्षात तब्बल शंभर भटक्या वन्यजीवांना जीवनदान दिले आहे.

या सर्वांच्या अत्यंत कमी कालावधीत आदर्श कामगिरी केल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे. या वर्षीपासून दरवर्षी युवादिनी हा सन्मान उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक सनी मानकर यांनी या प्रसंगी दिली.

कार्यक्रमाचे आयोजन सनी मानकर यांनी केले तर नियोजन महेश शिर्के यांचे होते. याप्रसंगी मिलिंद वालवडकर, प्रमोद शिंदे, स्वप्नील खवले, शुभम माताळे, आकाश मोहकर, सौरभ दसपुते, ऋषिकेश कडू, अमर सहाने, श्रीकांत बालघारे, शुभम झेंडे, व्यंकटेश भोंडवे, प्रणव बहिरट, रोहित पळसकर, शुभम मारणे हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.