Pune : रवी बापटले, प्रतिमा जोशी, राहुल रानडे यांना ‘धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’ जाहीर

एमपीसी न्यूज – धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या (Pune) ‘धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’ घोषित करण्यात आले आहेत. लातूर येथील सेवालय संस्थेचे प्रमुख रवी बापटले यांना 25 हजार रूपयांचा मुख्य पुरस्कार, तर शेल्टर असोसिएट्सच्या संस्थापिका प्रतिमा जोशी व संगीत दिग्दर्शक राहुल रानडे यांना प्रत्येकी अकरा हजार रूपयांचे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

Pune – पुण्यातील पहिल्या ‘पिकलबॉल’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण

यंदा पुरस्काराचे अठरावे वर्ष असून, धनंजय थोरात यांची पुण्यतिथीचे औचित्य (Pune) साधून येत्या बुधवारी (ता.18 सप्टेंबर) सायंकाळी 6.30 वाजता एस. एम. जोशी सभागृहात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. पंडित सत्यशील देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली आहे.

गेल्या वर्षी हे पुरस्कार विवेक वेलणकर, जावेद खान आणि पांडुरंग मुखडे यांना जाहीर करण्यात आले होते. त्यांचेही वितरण याच कार्यक्रमात होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्य पुरस्कार विजेते रवी बापटले हे एचआयव्ही एड्सग्रस्त अनाथ मुलांसाठी हासेगाव (ता. औसा, जि. लातूर) येथे सेवालय संस्था चालवतात. हे काम उभारताना आलेल्या असंख्य अडचणींना, प्रसंगी बहिष्काराच्या घटनेला सामोरे जात 2007 सालापासून नेटाने काम करत शेकडो मुलांचे भवितव्य घडवले आहे.

पत्रकार व प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. हॅपी इंडियन व्हिलेज हा भारतातील पहिला प्रकल्प त्यांनी उभारला. या मुलांना शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांनी स्वावलंबी बनवले आहे. समाजातील एका दुर्लक्षित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी बापटले यांनी संपूर्ण जीवन समर्पित केले आहे.

दुसरे पुरस्कार विजेत्या प्रतिमा जोशी व्यवसायाने आर्किटेक्ट असून, शेल्टर असोसिएट्सच्या संस्थापक व कार्यकारी संचालक आहेत. ही संस्था शहरी गरिबांसाठी स्वच्छता आणि सामाजिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या अंमलबजावणीचे काम करते. जोशी यांनी चेन्नई विद्यापीठातून आर्किटेक्ट, तर लंडनच्या बार्टलेट स्कुल ऑफ आर्किटेक्चर अँड प्लॅनिंगमधून मास्टर्स इन आर्किटेक्चर पदवी प्राप्त केली आहे.

1994 पासून त्यांनी आजवर पाचलाख शहरी झोपड्पट्टीवासियांच्या जीवनाची गुणवत्ता वाढवली आहे. एक घर एक शौचालय अंतर्गत महाराष्ट्रातील सात शहरांत 27 हजार पेक्षा अधिक शौचालय उभारली आहेत. 8 हजार शहरी झोपडपट्टीवासीयांना घरे उपलब्ध करून दिली आहेत.

तिसरे विजेते राहुल रानडे हे संगीत दिग्दर्शक व गायक आहेत. तीसपेक्षा अधिक वर्षे यांनी मराठी रंगभूमीवरील अनेक नाटके तसेच मराठी, हिंदी चित्रपटांना संगीत तसेच पार्श्वसंगीत दिले आहे. डॉ. प्रकाश बाबा आमटे या सिनेमातील राहुल यांनी संगीत दिलेले ‘तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे’ हे प्रार्थनागीत खूप लोकप्रिय झाले. राजा हरिश्चंद्र, काकस्पर्श, रणांगण, कच्चा लिंबू यांसारख्या मराठी, तर हत्यार, पिता, अस्तित्व, वास्तव यांसारख्या अनेक हिट चित्रपटांना राहुल रानडे संगीत दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.