Pune : वीजग्राहकांची व महावितरणची फसवणूक करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू – राजेंद्र पवार

एमपीसी न्यूज – वीजग्राहकांकडील मीटरच्या रीडिंगचे (Pune) मोबाईल अॅपद्वारे दरमहा फोटो रीडिंग घेणे व ते ऑनलाइन सबमीट करणे यापलीकडे मीटर रीडिंग एजन्सी व त्यांच्या रीडर्सचे ग्राहकांशी संबंधित कोणतेही काम नाही. कमी वीज बिलाचे आमिष दाखवून वीजग्राहकांची आर्थिक फसवणूक करणे, महावितरणचे महसूली नुकसान करणे हे प्रकार बिलिंगमधील तंत्रज्ञानामुळे लपून राहत नाही व ते कदापि खपवून घेतले जाणार नाही. संबंधितांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल’ असा स्पष्ट इशारा पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिला आहे.

पुणे परिमंडलातील सर्व 73 मीटर रीडिंग एजन्सीजचे (Pune) संचालक, व्यवस्थापकांची रास्तापेठ येथे शुक्रवारी (दि. 6) द्वैमासिक आढावा बैठक झाली. यावेळी मुख्य अभियंता पवार बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड, सहायक महाव्यवस्थापक (वित्त). माधुरी राऊत उपस्थित होते.

Tathavade : …तर घडली असती मोठी दुर्घटना

मीटरच्या अचूक रीडिंगसाठी मुख्यालय व पुणे(Pune) परिमंडलाकडून एकत्रितपणे दैनंदिन पर्यवेक्षण व दरमहा 2 टक्के रीडिंगची पडताळणी करण्यात येत आहे. पुणे परिमंडलातील सुमारे 33 लाख 15 हजार लघुदाब ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग कंत्राटी पद्धतीच्या एजन्सीजद्वारे करण्यात येते.

मात्र पडताळणीमध्ये मीटर रीडिंगचे फोटो अस्पष्ट असणे, फोटो व प्रत्यक्ष रीडिंगमध्ये तफावत असणे तसेच रीडिंग न घेता आल्याचा हेतुपुरस्सर शेरा देणे आदी प्रकार आढळून येत असल्याने त्यात सातत्याने सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याबाबत मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्याकडून मीटर रीडिंग एजन्सीजच्या कामाचा द्वैमासिक आढावा घेण्यात येत आहे. सद्यस्थितीत पुणे परिमंडलातील अचूक बिलिंगचे प्रमाण 95 टक्क्यांवर गेले असून मीटर रीडिंगच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाण केवळ 1.48 टक्क्यांवर आले आहे.

या बैठकीत अचूक मीटर रीडिंगसाठी स्थानिक उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी सांगितले की, मीटरचे फोटो रीडिंग घेण्याची प्रक्रिया स्वतंत्र मोबाईल अॅपद्वारे सोपी व वेगवान झालेली आहे. प्रत्येक मीटरच्या रीडिंगसाठी एजन्सीजना चांगला मोबदला दिला जातो. त्यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. एजन्सीजने नेमलेले मीटर रीडर्स यांच्याकडे मीटरचे फक्त अचूक रीडिंग घेण्याचे काम आहे.

मात्र ते ग्राहकांना वीजबिल कमी करून देण्याचे आमिष दाखवतात. ग्राहक व महावितरणची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे काही प्रकार दिसून आले आहे. हे प्रकार अत्यंत गंभीर असून ते खपवून घेतले जाणार नाही असे पवार यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य अभियंता पवार म्हणाले की, अचूक बिलिंगची प्रक्रिया सेंट्रलाईज व ऑनलाइन आहे. त्यामुळे चुकीचे रिडींग घेणे व फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा किंवा मीटर नादुरूस्त असल्याचा शेरा देणे असे हेतु पुरस्सर केलेले प्रकार लपून राहत नाहीत. त्यामुळे मीटर रीडर्स यांनी प्रामाणिकपणे अचूक बिलिंगसाठी अचूक रीडिंग व स्पष्ट फोटो घेण्याचे कर्तव्य बजवावे असे आवाहन त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.