Thergaon : दुर्मिळ ‘नवरंग’ला जीवनदान; पर्यावरण दिनी झेपावला आकाशात 

एमपीसी न्यूज –  जखमी अवस्थेतील नवरंग या दुर्मिळ पक्षाला थेरगाव सोशल फाउंडेशन व वर्ल्ड फॉर नेचरमुळे जीवनदान मिळाले आहे.
थेरगावातील गुजरनगर येथे 4 जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास थेरगाव सोशल फाउंडेशनचे राहुल यांना एका चिमुकल्या रंगबेरंगी पक्षावर कावळ्यांनी हल्ला चढविल्याची माहिती मिळाली. त्यांनी वर्ल्ड फॉर नेचर संस्थेशी संपर्क साधला. वर्ल्ड फॉर नेचरचे संकेत विटकर घटनास्थळी पोहोचलॆे त्यांनी नवरंग पक्षी ताब्यात घेतला. 

चिंचवडच्या संभाजीनगर येथील निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी उद्यानात त्यावर उपचार करण्यात आले. आज (बुधवारी) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवरंग पक्षासह व काही दिवसांपूर्वी जखमी अवस्थेत पकडलेले आणि उपचार पूर्ण होऊन बरे झालेले भुरा बगळा ( पॉन्ड हेरॉन), राखी बगळा (ग्रे हेरॉन) यांना टाटा लेक हाऊस येथे मुक्त करण्यात आले.

नवरंग या पक्षास इंग्रजी मध्ये इंडियन पिटा असे म्हणतात. हा पक्षी भारतातील सर्व वनांत आणि झुडपी वनांत आढळतो. त्याच्या विणीच्या काळात म्हणजे मे ते ऑगस्ट या काळात तो दिसतो. पक्षी मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवरंग हा पक्षी नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्याने शहरातून नामशेष झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.