Sangvi : मंदिराचा सभामंडप कोसळल्या प्रकरणी ठेकेदाराविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव येथे नदीच्या किनारी स्मशानभूमीजवळ सुरु असलेल्या महादेव मंदिराचा सभामंडप कोसळला. यामध्ये तीन मजुरांचा मृत्यू झाला. तर आठ मजूर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. 21) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलिसांनी ठेकेदाराला अटक केली आहे.

राहुल जयप्रकाश जगताप (वय 36, रा. पनदरे, ता. बारामती) असे अटक केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पोलीस उपनिरीक्षक विवेक कुमटकर यांनी फिर्याद दिली.

सिद्धम्मा मनतप्पा पुजारी (वय 30, रा. बोपोडी, पुणे), मानतोष संजीत दास (वय 30), प्रेमचंद शिबू राजवार (वय 31, दोघे रा. लेबर कॅम्प, पिंपळे निलख. मूळ रा. पश्चिम बंगाल) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत.

मलम्मा शरणाप्पा पुजारी (वय 45, रा. बोपोडी, पुणे), नीलम्मा शंकराप्पा पुजारी (वय 60, रा. बोपोडी, पुणे), समर सरदार (वय 28, रा. बोपोडी, पुणे), सेवाराम रामकुमार साहु (वय 31, रा. पिंपळे गुरव. मूळ रा. साहुपार सनकपाट, जी. बेमेतरा, छत्तीसगड), धनंजय चंदू धोत्रे (वय 24, रा. लेबर कॅम्प, पिंपळे गुरव), योगेश मच्छिंद्र मासाळकर (वय 29, रा. पिंपळे गुरव. मूळ रा. आष्टी, जि. बीड), कमलेश मलिकराम (वय 18, पिंपळे निलख. मूळ रा. मोलोडिया भिजलपूर, छत्तीसगड), अयप्पा मलप्पा सुगड (वय 35, रा. लेबर कॅम्प, पिंपळे निलख. मूळ रा. सुंबर, जि. गुलबर्गा) अशी जखमी कामगारांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथे स्मशान भूमीजवळ महादेव मंदिराचे बांधकाम सुरु आहे. हे बांधकाम अनधिकृत असल्याने बांधकाम काढण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून 16 नोव्हेंबर 2018 रोजी देण्यात आले आहेत. तरीही मंदिराचे काम सुरु ठेवले. काम सुरु असताना कामगारांना हेल्मेट, सेफ्टी शूज, सेफ्टी जाळी यांसारख्या सुरक्षा साहित्य व व्यवस्था पुरवल्या नाहीत. बुधवारी दुपारी काम सुरु असताना मंदिराचा सभामंडप पडून त्यात अकरा कामगार अडकले. त्यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी फिर्याद देत ठेकेदाराला अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.