Shapit Gandharv : शापित गंधर्व लेख 42 वा – अवलिया पद्माकर 

एमपीसी न्यूज : त्यांना परमेश्वराने प्रचंड प्रतिभा दिली होती, पण (Shapit Gandharv) सोबत दिली नव्हती ती नशिबाची साथ. असे म्हटले जाते की, त्यांना एकदा जरी संधी मिळाली असती तर त्यांनी भारतीय क्रिकेटमधे आपले अनन्यसाधारण स्थान निर्माण केले असते.

 

पद्माकर शिवलकर उर्फ पॅडी शिवलकर यांच्याबद्दल जेंव्हा जेंव्हा वाचायला मिळते तेंव्हा तेंव्हा मनाला एकच प्रश्न छळतो- या महान गोलंदाजाला का संधी मिळाली नाही? 14 एप्रिल की सप्टेंबर1940 रोजी मुंबई येथे स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या पद्माकरजी शिवलकर यांचे क्रिकेटमय आयुष्य म्हणजे एक निव्वळ चित्त्तरकथा आहे.

 

देव किती निष्ठुर असतो हे सोदाहरण स्पष्ट करणारे जळजळीत वास्तव आहे. अन् माणूस कितीही महान असला तरीही त्याला त्याचसोबत नशिबाची साथही का जरुरीचे असते हे दाहक सत्य पटवून देणारे उदाहरणही आहे.

 

त्याकाळी आजच्यासारखे प्रगतशील वातावरण नव्हते.कोचिंग नव्हते.खेळ म्हणजे करियर असा विचार करणे सुद्धा पाप होते. त्याकाळात घरात कुठल्याही पद्धतीचा वारसा नसतानाही पद्माकरजीनी निव्वळ दैवजात प्रतिभेच्या जोरावर आपले नाणे खणखणीतरित्या वाजवायला सुरुवात केली होती.त्यांच्या आयुष्यात टीपीकल कथेत अथवा चित्रपटात दाखवतात तसे हलाखीची गरीबी अन एक पण अतिशय जिवलग मित्र होता.

 

खरे तर घरची गरीबी अन साधे वातावरण यामुळे त्यांच्या डोक्यात क्रिकेटबद्दल फारशी आस नव्हती, पण त्यांच्या एका मित्राने म्हणजेच दत्तू सतेलकर यांनी. त्यांना हिंदू जिमखाना येथे एके दिवशी  जबरदस्ती नेले.तिथे एक नवोदित खेळाडूंसाठी एक सत्र चालू होते. ते ही लेदर बॉलने,तोवर पॅडी सरांनी कधीही टेनिसबॉलने गोलंदाजी केली नव्हती.

 

कोणाचे तरी किट मागवून घेत पद्माकरजी यांनी तिथे दत्तूजीच्या प्रेमाखातर भाग घेण्याचे मान्य केले, एवढयात त्यांना कुणीतरी सांगितले की त्यांना शिकवणाऱ्या माणसाचे नाव आहे विनू मांकड.हे नाव ऐकताच पद्माकरजीनी तिथून पळून जायचा विचार केला,पण दत्तूजीनी त्याना धीर देत,भाग घे असेच सुनावले. आणि इथूनच सुरू झाला त्यांचा क्रिकेटमधील अजरामर इतिहास.असे वाचण्यात येते की, पद्माकरजींनी टाकलेले पहिले काही चेंडू अजिबोगरिब होते, ते बघून दत्ताजी चिडून म्हणाले अरे भंडाऱ्या(पद्माकर शिवलकर याच समाजातून आले होते)कुठे चेंडू टाकतोस, जरा निट टाक की, पण जे दत्तूजीला दिसले नाही ते विनू मांकडजींना दिसले,आणि त्यांनी पद्माकर शिवलकर यांना या सत्रात जोवर ते आहे तोवर यायचेच असे सांगितले.यानंतर सुरू झाला तो मुंबई क्रिकेटच्या इतिहासातला गौरवशाली शिवलकर प्रवास.

त्यांचे शिक्षण मुंबईच्या फोर्ट येथील सिद्धार्थ  कॉलेजमधून झाले. याचदरम्यान त्यांनी आपले हात अन् नशीबही क्रिकेटमधे आजमावून बघायला सुरुवात केली.बघताबघता त्यांनी आपल्या नैसर्गिक प्रतिभेला विनू मांकडजी यांच्या मार्गदर्शनाखाली पैलू पाडायला सुरुवात केली अन मुंबईच्या क्रिकेट विश्वात त्यांच्या नावाचा महिमा गाजायला सुरुवात झाली.

 

त्यांची डावखुरी फिरकी गोलंदाजी खूपच प्रभावी ठरत असे. त्यामुळेच ते मुंबई रणजी संघाचा अविभाज्य घटक बनले.मोसम दर मोसम त्यांची प्रभावी कामगिरी त्यांना भारतीय संघात स्थान देण्यासाठी योग्य असूनही त्यांच्या नावाची दखल निवडसमितीने कधीही घेतली नाही. सहाशेच्या जवळपास रणजी स्पर्धेत बळी मिळवूनही त्यांना भारतीय संघात कधीही स्थान मिळाले नाही ते नाहीच.कधी बेदीचे नशीब उजवे ठरले तर कधी कर्णधाराना शिवलकर नकोसे झाले असे म्हटले जाते,यात सत्य किती ते परमेश्वरालाच माहिती. पण एक सत्य हेच की, इतकी प्रचंड गुणवत्ता असूनही त्यांना भारतीय संघात स्थान नाही तर नाहीच मिळाले.

 

तेंव्हा ना आताच्या सारखे आयपीएलचे मोसम असत, ना रणजी स्पर्धेत फारसे पैसे मिळत. पण या क्रिकेटवेड्या पण सज्जन माणसाने आपले उभे आयुष्य मुंबईच्या क्रिकेटसाठी खर्च केले.20 वर्षे ते मुंबई रणजी संघाचा भाग होते, त्यांनी 124 प्रथमश्रेणी सामने खेळले आणि त्यात त्यांनी 589 बळी मिळवले.तामिळनाडू विरुद्धच्या 1972 साली झालेल्या रणजीच्या अंतीम सामन्यात त्यांनी केलेली भेदक गोलंदाजी आजही मुंबईच्या असली क्रिकेटप्रेमीच्या हृदयात घट्ट वसलेली आहे.

 

केवळ 16 धावा देत त्यांनी घेतलेल्या 8 बळीमुळे मुंबईने ती रणजी स्पर्धा जिंकण्यात यश मिळवले होते.त्यांनी 42 वेळा एका डावात 5 किंवा त्याहून अधिक बळी मिळवले होते, तर 13 वेळा त्यांनी एका सामन्यात दहा वा त्याहून अधिक बळी मिळवले होते. म्हणजे ते किती जबरदस्त गोलंदाज होते, समजून घ्या.एवढे सगळे होवूनही त्यांच्या नशिबी कसोटी क्रिकेटचा टिळा लागला नाही तो नाही.म्हणायला त्यांनी श्रीलंका संघांविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले खरे पण ते अनधिकृत कसोटी सामने होते.

 

 

आपल्यावर अन्याय झाला हे माहीत असूनही त्यांनी कधीही ते कुठेही बोलून दाखवले नाही.जे झाले ते “त्याच्या” मर्जीने, हे त्यांना माहीत आहे.आजही ते नवोदित वा होतकरू युवा क्रिकेटपटूला मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तयार असतात.

त्यांनी “हा चेंडू दैवगतीचा” हे आत्मचरित्र लिहले आहे, जे खूप गाजले. ते माणूस म्हणूनही खूपच महान आहेत, असे मुंबईचे अनेक माजी क्रिकेटपटू मनापासून सांगतात. ते गायक म्हणूनही खूप उत्तम होते.त्यांच्यावर सतत अन्याय करणाऱ्या बीसीसीआयला अखेर 2017 मध्ये उपरती झाली आणि त्यांना अतिशय प्रतिष्ठित असा सर सी.के.नायडू जीवनगौरव पुरस्काराने  गौरविण्यात आले. आणि अशा रितीने बीसीसीआयच्या पापाचे परिमार्जन झाले.

 

एकंदरीतच त्यांचे चरित्र बघताना खेळ कुणाला दैवाचा कळला,असे का म्हणतात ते खरंच   खोटं नाही. वयाच्या 82 व्या वर्षातही त्यांचा उत्साह आणि आरोग्य कोणालाही हेवा वाटावा असंच आहे, याचं कारण म्हणजे ते असलेले उत्तम माणूस. पण तरीही त्यांच्या एकूणच कारकिर्दीला  बघता त्यांना कसोटी मध्ये स्थान मिळाले नाही याची खंत आपल्यासारख्या क्रिकेटरसिकांनाला लागून राहते.

 

असे का घडले याचे उत्तर कधीही मिळाले नाही अन मिळणारही नाही. पद्माकर शिवलकर यांना पुढील निरामय आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा..!

विवेक कुलकर्णी.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.