Shapit Gandharv : शापित गंधर्व – लेख 47 वा – अभिषेक

एमपीसी न्यूज : त्याने सोन्याचा नव्हे रत्नजडित चमचा तोंडात घेवूनच जन्म घेतला. अभिनयाचे विश्वविद्यालय त्याच्या घरात एक नव्हे दोन दोन आहेत. त्याला परमेश्वराने व्यक्तिमत्त्वही उत्तम दिले, थोडक्यात काय कोणालाही हेवा वाटावा,  असेच आयुष्य त्याला लाभले. कदाचित हाच त्याला मिळालेला सर्वात मोठा शाप असावा.

NCP : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ऑनलाईन अर्जासाठी मुदवाढ द्या;  अजित गव्हाणे यांची  मागणी

महानायक अमिताभ बच्चन आणि उत्तम अभिनेत्री जया भादुरी यांचे जेष्ठ अपत्य, दिसायला देखणा, अभिनयाची उपजत जाण, घरातून मिळालेला दैवी अन उपजत वारसा, असे सर्व काही असूनही त्याला अजूनही चित्रपटसृष्टीत स्वतःला सिद्धच करावे लागत आहे, त्याच्या चित्रपटसृष्टीतल्या 23 वर्षांनंतरच्या प्रवासानंतरही..!याला शाप म्हणणार नाही तर काय म्हणणार?

मोठ्या वृक्षांच्या सावलीत लहान वृक्ष कधीही वाढत नाही असे म्हणतात ते खोटे नाही. अगदी तसेच यशस्वी माणसाची मुलेही पुढे यशस्वी ठरलीच असे फारसे दिसत नाही. अभिषेक बच्चनच्या बाबतीत मलाही नेहमी हेच वाटते आणि मग ते मनाला पटतेही. त्याच्यापेक्षा जास्त लोकप्रिय आणि काम असणाऱ्या  नायकांना बघितले की तर हे मनाला वारंवार सत्य डाचतच राहते.

5 फेब्रुवारी 1976 रोजी मुंबईला एका चित्रपटसृष्टीतल्या मोठ्ठया  म्हणजेच बिग बी च्या घरात त्याचा जन्म झाला.जगातले कुठलेही सुख त्याच्यापुढे हात जोडून उभे होते. ही म्हणावी पूर्वजन्माची पुण्याई.त्याचे शालेय शिक्षण मुंबईच्या जमनाबाई नर्सी स्कुलमध्ये झाले तर बॉम्बे स्कॉटिश कॉलेज मधून त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतले.

त्यानंतर तो पुढील उच्च शिक्षण घ्यायला स्विझरलँड येथील “बोस्टन” या जगप्रसिद्ध विद्यापीठात गेला.गंमत म्हणजे बालपणी तो “डायलेक्सिया”या आजाराने त्रस्त असे.लिहता वाचता न येणे किंवा ते न समजणे असे याचे लक्षण मानले जाते.त्याचे इथले शिक्षण  चालू असतानाच दुर्दैवाने बिग बी यांच्या “एबीसीएल”या चित्रपट निर्मिती करणाऱ्या कंपनीला दिवाळखोरी आली अन तो तिथले शिक्षण अर्धवट सोडून भारतात परत आला.

खरे तर जन्म मृत्यू हे कोणाच्याही हातात नसते,तसेच कोठे जन्माला यावे हे ही आपल्या हातात नसते.अतिशय श्रीमंत घरात जन्म घेणे हे मागील जन्मातल्या चांगल्या कर्माचे फळ असे ढोबळरित्या आपल्या भारतीय लोकांची धारणा असते.अभिषेक बच्चनचा जन्म तर अशा घरात झाला की त्याने काहीही केले नाही तरीही त्याच्या पुढच्या कित्येक पिढ्या असेच शाही जीवन जगत राहतील, असे आपल्याला वाटते.

पण याच सत्याची दुसरी बाजू अशी असते की त्याने जे काही करावे ते बिग बी अमिताभला शोभावे.याचे दडपण किती असेल याची कल्पनाही न केलेली बरी.23 वर्षे चित्रपटसृष्टीत यशस्वी काढल्यानंतरही ,एक राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतरही ,अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळवल्यानंतरही त्याला चित्रपटसृष्टीत आजही स्ट्रगलर का म्हटले जाते हे समजता समजत नाही.

अमिताभ बच्चनचा मुलगा असूनही त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एल आय सी एजंट म्हणून केली हे सांगितले तर तुम्हाला नवलच वाटेल,पण हे सत्य आहे.यानंतर काही काळाने त्याने एबीसीएलचा कारभार आपल्या हाती घेतला.2000 साली सुप्रसिद्ध दिग्दर्शक जे.पी. दत्ता यांनी त्यांच्या “रिफ्युजी” या महत्वाकांक्षी चित्रपटात त्याला करिना कपूर सोबत साईन करत त्याच्या पदार्पणाला संस्मरणीय केले.

उत्तम संगीत,अवीट गाणी,दत्ताजीचे दिग्दर्शन,चांगली कथा या सर्वांचा इम्पॅक्ट असा व्हावा असे वाटत होते की, हा चित्रपट त्याला पदार्पणातच सर्वकाही मिळवून देईल. चित्रपट तितका यशस्वी झाला नसला तरी फ्लॉपही नव्हता, पण याचे जास्तीत जास्त श्रेय दत्ताजी ,आणि करीना कपूरला दिले गेले.

तुम्हाला हे ही वाचून धक्का बसेल की रिफ्युजी धरून तब्बल त्याचे पुढील 17 चित्रपट अयशस्वी ठरले.त्यानंतर आलेल्या “धूम” या चित्रपटाने त्याला खरे यश मिळवून दिले,पण इथेही श्रेय यशराज बॅनरला जास्त मिळाले.त्यानंतर  मात्र त्याचे चार  सलग चित्रपट यशस्वी ठरले. बंटी और बबली,सरकार, दस,ब्लफ मास्टर.

त्याची गाडी रुळावर येतेय असं वाटत असतानाच मनिरत्नम यांच्या ‘”गुरू” या धीरूभाई अंबानी यांच्यावर आधारित चित्रपटाने त्याला खऱ्या अर्थाने अभिनेता म्हणून सर्वार्थाने मान्यता दिली.यानंतर ही त्याचे बरेचसे चित्रपट आले,यशस्वीही ठरले,पण त्याला त्याच्या “पा” सारखे सोलो नायक म्हणून स्वतःला अजूनही प्रस्थापित करता आले नाही, हे नाईलाजाने का होईना पण दुर्लक्षित करुन चालणार नाही.

खरेतर त्याला अभिषेक म्हणून भारतीय प्रेक्षक बघतच नाहीत,हे सत्य आहे.तो महानायक अमिताभ यांचा मुलगा आहे अन त्याने तसेच करावे हे इथल्या तमाम चित्रपट रसिकांना वाटते,अन यातच त्याच्या यशाची अन कारकिर्दीचीही ससेहोलपट होत आहे असे मला तरी वाटते.

त्याची एकूण संपत्ती 30 बिलियन आहे असे म्हटले जाते(म्हणजे किती ते मला अजिबात समजले नाही ,तसेही मला कोणाची श्रीमंती किती हे जाणून घेणे मुळीच आवडत नाही)तो अमिताभ बच्चन यांचा मुलगा असल्याने त्याला कशाचीही कमी नसणार हे तर वादातीत सत्य आहे.

त्याने जागतिक सुंदर(एकेकाळची मिस वर्ल्ड आणि चित्रपटसृष्टीतली यशस्वी तारका)ऐश्वर्या राय सोबत सप्तपदीची गाठ 2007 साली बांधली आहे अन त्याचे  वैवाहिक आयुष्य ही अतिशय छान असे आहे.या जगातल्या सर्वात सुंदर दांपत्याला आराध्या नावाची एक गोड मुलगी ही आहे.लौकिक अर्थाने यापेक्षा सुंदर जगात काहीच असू शकत नाही, नाही का? पण हेच सौंदर्य त्याला जणू शाप म्हणून छळत राहते,त्यात त्याचा काहीही दोष नसताना देखील.

परमेश्वराने त्याची या शापातून मुक्तता करुन अभिषेक बच्चन एक उत्तम आणि यशस्वी अभिनेता अशी त्याची स्वतःची खास आणि अभिमानास्पद ओळख बनवून  द्यावी,इतकीच त्याच्याकडे एक सिनेरसिक म्हणून प्रार्थना.त्याच्याकडे हे होण्यासाठी उदंड आयुष्य आहेच ते खऱ्या अर्थाने यशस्वी ,आदर्श आणि प्रत्येकाला आवडावे असेच होवो.

विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.