Pune Metro News : पुणे-पिंपरी चिंचवड शहरे एक ऑगस्ट पासून मेट्रोने जोडली जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार मेट्रोच्या तीन मार्गांचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – पुढील आठवड्यात पुणे मेट्रोचा विस्तार होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्ट रोजी दुसऱ्या टप्प्यातील 11.66 किलोमीटर मार्गाचे लोकार्पण होणार आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pune Metro News ) ही दोन शहरे मेट्रो मार्गाने देखील जोडली जाणार आहेत.

Shapit Gandharv : शापित गंधर्व – लेख 47 वा – अभिषेक

दुसऱ्या टप्प्यात फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट (6.91 किलोमीटर), गरवारे महाविद्यालय ते सिव्हील कोर्ट (2.38 किलोमीटर), सिव्हील कोर्ट ते रुबी हॉल (2.37 किलोमीटर) या तीन मार्गांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश असणार आहे. या सर्व मार्गांसाठी सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशन हे इंटरचेंज असणार आहे. यामुळे वनाज ते पिंपरी-चिंचवड आणि रुबी हॉस्पिटल ते पिंपरी-चिंचवड तसेच वनाज या मार्गावर मेट्रोने प्रवास करता येणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरादरम्यान मेट्रो सुरु झाल्यास दोन्ही शहरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. पिंपरी येथून पुणे शहरात जाण्यासाठी तासाभराचा कालावधी लागतो. त्यात वाहतूक कोंडी, प्रदूषण अशा समस्यांचा सामना करावा लागतो. तर लोकलच्या फेऱ्या कमी असल्याने लोकल बद्दल पिंपरी-चिंचवडकरांमध्ये काहीशी नाराजी आहे.

6 मार्च 2022 रोजी पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 12.2 किलोमीटर मार्गाचे लोकार्पण झाले. गरवारे मेट्रो स्थानकात हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मोदी यांनी मेट्रो मधून प्रवास करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मेट्रो सुरु झाल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी सुरुवातीला पर्यटन म्हणून मेट्रोने प्रवास केला. मात्र पिंपरी मधून पुणे शहरात जाण्यासाठी मेट्रो उपयोगाची नसल्याने मेट्रोकडे दळणवळणाचे साधन म्हणून पाहिले गेले नाही.

आता दुसऱ्या टप्प्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरे एकमेकांना जोडली जाणार असल्याने दोन्ही शहरातील नागरिकांना दळणवळणाचा सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.