Pune : निवडणूक आयोगाच्या ‘घरोघरी अधिकारी’ उपक्रमाला सुरुवात

एमपीसी न्यूज – भारतीय लोकशाही बळकट (Pune) करण्यात भारत निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची आहे. आयोगाने निवडणूक प्रक्रियेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक सुधारणा केल्या आहेत. निवडणूक पारदर्शकपणे घेण्यासोबत आता सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्यावर तसेच मतदारांच्या दृष्टीने निवडणुका सुविधाजनक होतील यावर भर देण्यात येत आहे. मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने राज्यात 21 जुलैपासून ‘घरोघरी अधिकारी’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

21 ऑगस्ट 2023 पर्यंत संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या नावांची पडताळणी करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या एक महिन्यादरम्यान घरोघरी भेट देऊन मतदारांचे वैयक्तिक तपशील, पत्ता आणि छायाचित्रांची पडताळणी करणार आहेत. या मोहिमेद्वारे मृत आणि स्थलांतरीत मतदार, दुबार नोंदणी असलेले मतदार, मतदारांचाही शोध घेणार आहेत.

तसेच मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया, यासोबतच नव मतदार, तृतीयपंथी आणि विमुक्त जाती भटक्या जमातीतील मतदार, देहव्यवसाय करणाऱ्या महिला मतदारांचा शोध घेऊन त्यांची आणि मतदार यादीत नाव नसलेल्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.

घरोघरी अधिकारी या उपक्रमामुळे राज्यातल्या मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचे आणि अद्ययावतीकरणाचे काम सुलभ होणार आहे. हा उपक्रम म्हणजे आपण आपल्या मताधिकारापासून वंचित राहू नये याची सुनिश्चिती करण्याची नागरिकांसाठी मोठी संधी आहे.

त्यामुळे जेव्हा हे अधिकारी आपल्या घरी येतील तेव्हा (Pune) नागरिकांनी आपले स्वतःचे, आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे मतदार यादीत आहेत की नाहीत हे तपासून घ्यावे. वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत पण अजूनही मतदार नोंदणी केलेली नाही अशांची मतदार नोंदणी करून घ्यावी.

मतदार यादीतील आपले वैयक्तिक तपशील, पत्ता यात काही दुरूस्त्या असतील तर त्यासाठीचे अर्ज भरून द्यावेत. लग्नानंतर नाव बदललेल्या स्त्री मतदारांनी आपली नावे बदलून घ्यावीत. स्थलांतरीत झालेल्यांनी नव्या पत्त्याची नोंद करून घ्यावी.

मतदार नोंदणीसाठी अर्जासोबत रहिवास पुरावा म्हणून विद्युत देयक, पाणी पट्टी, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, भारतीय पारपत्र, नोंदणीकृत विक्रीखत, नोंदणीकृत भाडेकरार यापैकी एका तर वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, आधारकार्ड, राज्य शिक्षण मंडळाने दिलेले दहावी, बारावीचे प्रमाणपत्रे यापैकी एका पुराव्याची आवश्यकता आहे.

निवडणूक प्रक्रियेविषयी असणारी उदासीनता दूर करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांमधील सदस्यांनी सहकार्य करावे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कर्तव्यभावनेने सुटीच्या दिवशी आपल्याकडे मतदार नोंदणीसाठी येत असताना त्यांना प्रतिसाद देऊन 100 टक्के मतदार नोंदणी करून अभियान यशस्वी करावे.

Pune Metro News : पुणे-पिंपरी चिंचवड शहरे एक ऑगस्ट पासून मेट्रोने जोडली जाणार

लोकशाही प्रक्रियेत मतदारांची भूमिका महत्त्वाची आहे. सर्वसमावेशकता आणि मतदारांचा सहभाग असल्यास लोकशाही यशस्वी ठरते. देशाचे भवितव्य तरुणांच्या हातात असताना युवा मतदारांची नोंदणीची टक्केवारी खूपच कमी आहे. हे चित्र बदलण्याची गरज असून युवांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे, असे आवाहन निवडणूक आयोगाच्यावतीने करण्यात आले आहे.

मतदारांनी निवडणूक आयोगाचे ॲप आणि संकेतस्थळाचा वापर करून मतदार यादीतील नाव तपासून घ्यावे. 21 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ घेत नागरिकांनी या प्रक्रियेत सहभाग घ्यावा. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हा निवडणूक प्रक्रियेचा कणा आहे त्यांच्या प्रयत्नांना गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांनी साथ द्यावी.

मतदारांशी संबंधित सर्व प्रकारच्या अर्जासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.