Shapit Gandharv : शापित गंधर्व – लेख ३९ वा – प्रिया गील

एमपीसी न्यूज  :  आजपासून बरोबर 24 वर्षांपूर्वी एक हिंदी सिनेमा प्रदर्शित झाला होता,”सिर्फ तुम”नावाचा.संजय कपूर(अनिल आणि बोनी कपूरचा छोटा भाऊ),मिस वर्ल्ड सुश्मिता सेन,जॅकी श्रॉफ या स्टार्ससोबत आणखी एक टवटवीत चेहराही या सिनेमात होता, प्रिया गील नावाचा. 

जिने “अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड, म्हणजेच एबीसीएल निर्मित तेरे मेरे सपने नावाच्या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. नैनिताल, केरळच्या अप्रतिम लोकेशनवर चित्रित झालेल्या या चित्रपटाने उत्तम कथानक, अवीट गाणी यांच्या जोरावर समीक्षक आणि रसिकांनाही मंत्रमुग्ध करत चांगलेच यश कमावले होते.

यातल्या या मोठमोठ्या कलाकारांसोबत प्रिया गीलने ज्या आत्मविश्वासाने आपली भूमिका निभावली होती, ते बघता ही गोड चेहऱ्याची आणि अभीनयाची उत्तम जाण असलेल्या मुलीचे भवितव्य उज्ज्वल आहे असा अंदाज मोठमोठ्या निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी व्यक्त केला होता, मात्र लोभस चेहरा, आपल्यापैकी वाटणारी,सशक्त अभिनय करणारी प्रिया गील का कुणास ठावूक पुढे चाललीच नाही, आणि आज तर ती कोठे आहे हे ही कोणाला माहिती नाही.

खेळ कुणाला दैवाचा कळला असे एक जुने अन लोकप्रिय मराठी गीत मला असे काही वाचण्यात आले की क्षणात आठवते आणि मनाला हे ही पूर्णपणे पटते की “त्याचा” खेळ खरोखरच कोणालाही कळाला नाही ,कळत नाही अन कळणारही नाही.

“शापित गंधर्व”ही लेखमाला ज्या ज्या असामान्य व्यक्तिमत्वावरुन मला सुचली त्यातलेच एक नाव होते,प्रिया गीलचे. ९ डिसेंबर 1975 साली जण8 आलेली ही एका पंजाबी कुटुंबातील कुडी ,म्हणजेच या लेखाची नायिका प्रिया गील. भारतीय जनतेला रुपेरी पडदा ,राजकारण आणि क्रिकेट या तीन गोष्टींचे का कुणास ठाऊक पण प्रचंड वेड आहे, यातले यशस्वी व्यक्तीमत्वे इथल्या समाजाला अगदी आपले दैवत , मित्र किंवा घरातले असावेत असेच वाटते, हे जरी खरे मानले तरी यशाच्या शिखरावर काही वर्षे विराजमान होऊ शकेल असे आत्मविश्वासाने भाकिते करणाऱ्याना सुद्धा प्रिया गील बद्दलची वैयक्तिक माहिती फारशी नाही, तिची जन्मतारीख सुद्धा विकीपिडियावर 9 डिसेंबर 1975 तर काही वेळा 1977 दाखवली जाते,तिची कौटुंबिक माहिती कुठेही फारशी सापडली नाही,

पण इतके कळते की वयाच्या 18?की 20 व्या वर्षीच ती मिस इंडिया उपविजेती ठरली होती. ही अतिशय मोठी आणि प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते, यात यश मिळाले की हिंदी सिनेसृष्टीत पाऊल रोवणे बऱ्यापैकी सोपे जाते, साहजिकच उपविजेते ठरलेल्या प्रिया गीलच्या साध्या पण मनाला आकर्षित करणाऱ्या लोभस सौंदर्याने फिल्मी दुनियेतल्या जवाहिऱ्याना तिची दखल घेण्यास भाग पाडले.परमेश्वराची कृपा झाली अन तिला चक्क एबीसीएल या महानायक अमिताभ बच्चन यांच्या निर्मिती संस्थेने करारबद्ध करुन मोठी संधी दिली,यात तिचा नायक होता,चंद्रचूडसिंग.पारो शास्त्री नावाचे तिचे पात्र या चित्रपटात होते.

या चित्रपटाने बऱ्यापैकी यश मिळवलेही,पण त्याचे बरेचसे क्रेडिट गेले एबीसीएलला आणि अर्षद वारसीच्या टपोरी पण शानदार भूमिकेला.पण तरीही तिच्या शालीन सौंदर्याने आणि सकस अभिनयाने अनेक मोठमोठ्या दिग्दर्शक आणि निर्मात्याना तिची दखल घेण्यास भाग पाडले.

याचदरम्यान आलेल्या सिर्फ तुमने तर ती एक उत्तम अभिनेत्री आणि महानायिका होण्यास पात्र असल्याचे शिक्कामोर्तबच केले होते, त्यानंतर तर ती चक्क शाहरुख खान सोबत अपून बोला तू मेरी लैला वो बोली फेकता है साला या लोकप्रिय गाण्यावर थिरकताना त्याची नायिका म्हणून जोश या चित्रपटातही झळकली होती, या चित्रपटात तिच्या सोबत होती ऐश्वर्या राय, पण प्रिया कुठेही कमी पडली नाही, उलट तिचे सौंदर्यआणि अभिनय जास्त सरस वाटले होते.

तिची गाडी आता योग्य ट्रॅकवर चालायला लागली आहे असे वाटत असताना नशिबाचे चक्र असे काही उलटे फिरायला लागले की एक महानायिका होवू शकणारी प्रतिभावंत आणि आणि अस्सल सौंदर्यवती सर्व काही जवळ असूनही सिनेसृष्टीपासून दूर पडत गेली, तिने आपला मोर्चा प्रादेशिक सिनेमाकडे वळवला, मल्याळम सिनेसृष्टीत तिने आपले नशीब आजमावून बघितले, तिला मेगास्टार नागार्जुन सोबत सिनेमाही मिळाला,यशही, पण तिथेही तिचे बस्तान बसले नाही ते नाहीच. तमीळ, तेलगू,पंजाबी अशा विविध प्रादेशिक भाषेत काम करुनही तिला सिनेसृष्टीला अपेक्षित असणारे व्यावसायिक असे काही मिळाले नाही, २००६ साली आलेल्या भैरवी या अखेरच्या चित्रपटानंतर तिला पुन्हा(आजपर्यंत तरी)काम मिळाले नाही अन ही कमनशिबी अभिनेत्रीला सिनेसृष्टीने पद्धतशीररित्या विसरायला सुरुवात करून आपल्या व्यावसायिक की स्वार्थी वृत्तीचे दाहक दाखलेही दिले.

तिच्या पासंगालाही न पुरणाऱ्या तरीही यशाच्या शिखराजवळ वा शिखरावर असणाऱ्या सामान्य नटमोगऱ्या बघितल्या की परमेश्वराची लीला किती कठोर आणि दाहक असते हे सत्य मनाला डसल्याशिवाय राहत नाही. ती आता काय करते हे नीटसे कळत नाही ,कुठेतरी ती एक सामान्य स्त्री सारखे जीवन जगत आहे असे वाचण्यात येते तर कुठेतरी ती आपल्या वैवाहिक जीवनात सुखी असुन भारताबाहेर आहे असे कळते. एक नक्की की ती का बाहेर पडली ,तिला यश का मिळाले नाही या प्रश्नाइतकेच ती सध्या कुठे आहे या प्रश्नांलाही उत्तर मिळतं नाही.

असे का होते, या प्रश्नाला कधीही ठोस उत्तर मिळत नाही, खरे तर ती यशस्वी ठरली काय अन अयशस्वी ठरली काय,सामान्य माणसाला याने काहीच फरक पडत नसतो,तरीही आपण आपल्यालाच असे प्रश्न करत बसतो अन हवे ते उत्तर मिळाले नाही की उगाचच हळहळत बसतो,ही आत्मीयता, कळकळ की नसती उठाठेव सिनेसृष्टीचे आकर्षण वाढवते की तिचे दुसरे बेगडी रूप दाखवते हे तुम्हीच सांगा,पण एक नक्की परमेश्वराने प्रिया गीलला खूप काही देवूनही काहीच दिले नाही असे मनाला वाटल्याशिवाय राहत नाही ,बरोबर ना?

प्रिया गील जिथे कुठे असेल तिथे सुखी असो आणि तिला तिच्या आयुष्यात जे ने हवे ते सर्व मिळो, इतकीच मानवतेच्या भावनेने “त्याच्या चरणी” प्रार्थना.
विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.