Sinhagad : लोखंडी जाळीत अडकलेल्या चिमुकल्याची अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुखरुप सुटका

एमपीसी न्यूज : सिहंगड कॉलेज रस्त्यावर (Sinhagad) असलेल्या एका सोसायटीमध्ये गॅलरीच्या लोखंडी जाळीमध्ये अडकलेल्या एक वर्षाच्या चिमूकल्याला अग्निशमन दलाने यशस्वी रित्या वाचवले. ही घटना आज हिंगणे खुर्द येथील राजश्री सोसायटीमध्ये घडली. 

सविस्तर माहिती अशी, की राजश्री सोसायटीमध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक लहान बाळ अडकल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला मिळाली. माहिती मिळताच तातडीने सिहंगड अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना झाले.

घटनास्थळी पोहोचताच जवानांना समजले की, दुसऱ्या मजल्यावर एका सदनिकेच्या गॅलरीमध्ये असणाऱ्या लोखंडी जाळीमध्ये एक वर्षाचे बाळ अडकले असून दरवाजा देखील बंद झाला आहे. जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच धाव घेतली असता बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला.

प्रथम अग्निशमन वाहनातील कॉम्बी टुल किटमधील हायड्रोलिक स्प्रेडर व जॅकचा वापर करुन दरवाजाची कडी तोडली.  आत (Sinhagad) गेले असता बाळाचे डोके त्या लोखंडी जाळीमध्ये अडकले असल्याचे आढळून आले. त्यामुळे बाळ तळमळत होते.

घटनेचे गांभीर्य पाहून बाळाची हालचाल होऊ नये आणि यशस्वी रित्या त्याला बाहेर काढण्यासाठी बाळाच्या आईला त्याच्याजवळ बसवत अगदी कुशलतेने अग्निशमन उपकरण वापरुन त्या बाळाची पाचच मिनिटात सुखरुप सुटका केली. बाळाच्या आई वडिलांनी दलाच्या जवानांनी केलेल्या कामगिरीबद्दल आभार मानले.

या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्र येथील वाहनचालक अशोक कडू व जवान तुषार करे, संभाजी आटोळे, आदिनाथ पवार यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.