pune news : चतु:शृंगीच्या वरिष्ठ निरीक्षकावर पोलीस आयुक्तांची कडक कारवाई; वाचा काय झाली कारवाई?

एमपीसी न्यूज : वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश डावलने, पोलीस स्टेशन हद्दीतील आस्थापना रात्री उशिरापर्यंत चालू राहूनही त्याकडे दुर्लक्ष करणे, आणि प्रलंबित अर्जांचा निपटारा वेळेत न करणे यासारख्या कारणामुळे पुणे पोलीस आयुक्तालयातील चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाई केली आहे. या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची देय वार्षिक वेतनवाढ त्या पुढील वेतन वाढीवर परिणाम होणार नाही अशा रीतीने एक वर्षाच्या कालावधीसाठी रोखण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन स्तरावरील दिवसभराच्या घडामोडी, दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती आणि आरोपींची माहिती पोलीस आयुक्तांना दररोज देण्याचे आदेश या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला देण्यात आले होते. मात्र वारंवार सांगूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.

Baramati news : बारामती तालुक्यातील दुर्दैवी घटना, ‘या’ कारणामुळे दोघांना गमवावा लागला जीव

दुसरीकडे चतु:शृंगी पोलीस स्टेशन हद्दीतील आस्थापना रात्री उशिरापर्यंत चालू राहतात. त्यामुळे गुन्हेगारीत वाढ होत आहे. यासंदर्भात वारंवार सूचना देऊनही यात कोणताही बदल झाला नाही. तसेच हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रात्रगस्तीवर असतानाही आस्थापना रात्री उशिरापर्यंत सुरू राहतात. याकडे हेतू पुरस्पर दुर्लक्ष केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

याशिवाय या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने एप्रिल 2021 मध्ये चतु:शृंगी पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला होता. तेव्हापासून या पोलीस ठाण्यातील तक्रार अर्ज मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. प्रलंबित असणाऱ्या अर्जांची तत्काळ निर्गती करण्याबाबत वरिष्ठांनी वारंवार सूचनाही दिल्या होत्या. परंतु वारंवार सूचना देऊनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

एकंदरीतच या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने आपले कर्तव्य बजावताना हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.