Talegaon News: नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्याम पोशेट्टी यांना 9 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटक, उद्यान अधीक्षक फरार

एमपीसी न्यूज –  व्यायाम साहित्याच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी ठेकेदाराकडून नऊ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व उद्यान अधीक्षक यांच्यावर सोमवारी (दि.31) सायंकाळी 5 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी उद्यान अधीक्षक फरार झाला असून मुख्याधिकारी यांना सायंकाळी सहा वाजता अटक करण्यात आली आहे.

मुख्याधिकारी श्याम पोशेट्टी (वय 40, रा. फ्लोरा सिटी, तळेगाव दाभाडे ता. मावळ)  व उद्यान अधीक्षक विशाल मिंड अशी लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी संबंधित ठेकेदार कंपनीच्या वतीने फिर्याद देण्यात आली आहे.

लाच लुचपत प्रतिबंध विभाग पुणे पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत फिर्यादी ठेकेदार यांनी विविध ठिकाणी व्यायाम साहित्य पुरवठा केला होता. त्या मोबदल्यात 55 लाख रुपयांची एकूण चार बिले नगरपरिषदेकडून ठेकेदाराला मिळणे बाकी आहे.

प्रलंबित बिलांची रक्कम अदा करण्यासाठी नऊ लाख रुपयांच्या लाचेची मागणी उद्यान अधीक्षक विशाल मिंड यांनी ठेकेदार यांच्याकडे सहा मे रोजी केली. या मागणीला मुख्याधिकारी श्याम पोशेट्टी यांनी सहमती दिली होती. विशेष म्हणजे पोशेट्टी यांनी चार मे रोजी मुख्याधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला होता.

ठेकेदार यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस उप अधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अलका सरग, सुनील बिले, पोलीस नाईक वैभव गोसावी, महिला पोलीस कर्मचारी पूजा पागिरे व चालक  दामोदर जाधव यांच्या पथकाने साक्ष व पुरावे पडताळणी करुन नऊ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे आरोपीकडून निष्पन्न झाले आहे. त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस निरीक्षक अलका सरग करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.