Talegaon News : तुकाराम महाराजांचे साधना करतानाचे चित्र त्यांच्या जीवनातील सुप्त बाजू जगासमोर आणणारे – बच्चू कडू

एमपीसी न्यूज – नाशिक येथील विक्रीकर निरीक्षक  सुनील शेलार यांनी लॉकडाऊनच्या काळात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावरील एका प्रसंगाचे अत्यंत हुबेहूब चित्र अथक मेहनत करून काढले आहे.

या चित्राचे अनावरण राज्यमंत्री बच्चू कडू, ह. भ. प. अजय महाराज बारस्कर, संतोष पवार, विनोद सिंग परदेशी, श्री क्षेत्र भंडारा डोंगराचे विश्वस्त रामभाऊ कराळे पाटील, दत्तोबा कराळे पाटील, किसन कराळे पाटील, तानाजी कराळे पाटील, शांताराम कराळे पाटील, युवा मोटिवेशनल स्पीकर शुभम मेदनकर, पिंपरी चिंचवड प्रहारचे शहराध्यक्ष नंदकिशोर जगदाळे व संघटक नीरज कडू यांच्या उपस्थितीत पार पडले.

यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, जगद्गुरु तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर साधना करत असताना त्यांच्याजवळ वाघ, सिंह आले. अंगावर मोठ मोठे  नाग हिंडू फिरू लागले  पण तुकाराम महाराजांचे चित्त शुद्ध असल्यामुळे हे सर्व शत्रुही त्यांचे  मित्र झाले हा प्रसंग सुनील शेलार यांनी चित्राच्या माध्यमातून अत्यंत  हुबेहूब साकारला.

या चित्राच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबारायांचे वेगळी माहिती जगासमोर येत आहे. मी पंढरीचा प्रत्यक्ष पायी चालणारा वारकरी जरी नसलो तरी जगद्गुरू तुकारामांच्या विचाराने काम करणारा, रंजल्या गांजलेल्यांची सेवा करणारा आणि ‘भले तरी देऊ’ या अभंगाप्रमाणे वागणारा मी अनुयायी आहे.  त्यामुळे या चित्राचे प्रकाशन अनावरण माझ्या हातून झाले हा वेगळाच आनंद माझ्या जीवनामध्ये आला आहे. सुनील शेलार यांचे मी अभिनंदन करतो, असे मनोगत त्यांनी यावेळी मांडले‌.

यावेळी अजय महाराज बारस्कर म्हणाले की भंडारा डोंगरावर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कपाट म्हणजेच सम्राट अशोककालीन लेण्यांमध्ये अत्यंत कठोर साधना केली, एकांतामध्ये अभंगलेखन केले. येथे एक स्तुप आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या काळापासून वारकरी परंपरेमधील अनेक संत महाराज कीर्तनकारांनी या लेण्यांमध्ये साधना केली आहे. अभ्यास केला आहे. या लेण्यांना वारकरी धर्मामध्ये कपाट असे म्हणतात.

व्याघ्र सर्प विंचू अंगाशी झोंबले ! अभंग भामचंद्र डोंगरावर केला तर पूर्ण अनुभूती
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती  ! व्याघ्र ही न खाती सर्प तया !!

हा अभंगाचे चित्रण करण्यात आले आहे. महाराजांच्या समोर वाघ-सिंह आले तरीही महाराजांनी निर्धार सोडला नाही .अंगावर नाग फिरत होता विंचु फिरत होते, परंतु माणसाचे चित्त शुद्ध असले कि हिंस्र प्राणी आपली वृत्ती सोडून शांत होतात हा अनुभव तुकोबारायांच्या जीवनात आला. हा प्रसंग सुनील शेलार यांनी  चित्रबद्ध केला. त्यामुळे तुकाराम महाराजांचे हे वेगळे रूप समाजासमोर आले आहे.

मूळ अहमदनगर येथील असलेले सुनील शेलार यांनी कुठेही चित्रकलेचे शिक्षण घेतलेले नाही. शालेय शिक्षणानंतर कॉम्प्युटर इंजिनिअर त्यानंतर सेल टॅक्स इन्स्पेक्टर अशा शासकीय सेवेत काम करणाऱ्या  या अधिकाऱ्याने आपल्या अंगातील सुप्त कला या अप्रतिम चित्रामधून प्रदर्शित केली आहे. मी तमाम वारकरी संप्रदायाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्यांच्या हातून अशीच सेवा घडावी, अशी तुकोबाराया चरणी प्रार्थना करतो.

यावेळी सुनील शेलार म्हणाले की, मी सहज एक शिवाजी महाराजांचे चित्र काढले ते व्हॉट्सअ‍ॅपवर टाकले अनेकांनी माझे कौतुक केले बारस्कर महाराजांनी हे चित्र पाहिले आणि मला हा प्रसंग सांगितला या लेण्यांची चित्रे फोटो मला पाठवले आणि मला हे चित्र काढायचे सांगितले खरंतर मी कुठलेही चित्रकलेचं शिक्षण घेतलं नाही परंतु सहज सरावांनी मला हे जमत गेले. याकामी अनेकांनी मला मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानतो.

या कार्यक्रमाचे स्वागत पिंपरी-चिंचवड प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष  नंदकिशोर जगदाळे यांनी केले तर आभार पुणे जिल्हा संघटक नीरज कडू यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.