Talegaon News : ‘कोरोना मृतांवरील अंत्यसंस्कारासाठी वडगाव, लोणावळा हद्दीत गॅस दाहिनी सुरु करा’

मावळ तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्काराचा ताण बनेश्वर स्मशानभूमीवर पडत आहे.

एमपीसीन्यूज – मावळ तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्काराचा ताण बनेश्वर स्मशानभूमीवर पडत आहे. लोकसंख्येचा विचार करता लोणावळा व वडगाव नगरपंचायत हद्दीत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गॅस दाहिनी सुरु करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

मावळ तालुक्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यावर त्याचा कोरोना अहवाल येण्यास उशीर होत असल्यास मृतदेह शितगृहात ठेवण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटलमध्ये यावे लागते.

त्यात कोरोना रुग्ण मावळ तालुक्याच्या बाहेर मृत झाल्यावर त्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांची आर्थिक लूट होते.

मृतदेह शितगृहात ठेवण्यासाठी एकावेळी 1500 रुपये किंमतीचे 3 पीपीई किट तसेच मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी 1500 रुपये किंमतीचे 3  पीपीई किट असे एकूण 9000 रुपयांचे पीपीई किट खरेदी करावे लागतात.

तसेच मृतदेह शितगृहात ठेवण्यासाठी 1000 रुपये पावती फाडावी लागते. त्यानंतर अंत्यसंस्कार करताना 2200 रुपये घेतले जातात. त्याआधी संबंधित  रुग्णाची वैद्यकीय बिले भरून नातेवाईकांची कंबर मोडलेली असताना त्यांना हा अतिरिक्त बोजा उचलावा लागतो.

मावळ तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचा विचार करता लोणावळा व वडगाव नगरपंचायत येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी गॅस दाहिनी सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे, नगरसेवक गणेश काकडे, सोमा भेगडे, रमेश भुरुक, अक्षय वारींगे आदींनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.