Dighi : मुलाने चतुराई दाखवत अपहरणकर्त्यांपासून केली स्वतःची सुटका

अपहरणकर्त्यांविरुध्द दिघी पोलिसांत गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – "तुझ्या मम्मीचा अॅक्सीडेंट झालाय. मला तुला घ्यायला पाठवलंय. चल आपण जाऊ", असे म्हणून ती महिला 14 वर्षाच्या मुलाला अपहरण करण्याच्या हेतूने घेऊन निघाली. पण, मुलाला महिलेचा संशय आला. त्याने चपळाईने तिच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत, थेट घर गाठले. हा प्रकार दिघी जकातनाका येथे सोमवारी (दि. 25) रात्री आठच्या सुमारास घडला.

प्रसाद गणेश शिंदे (वय 14) असे या धाडसी मुलाचे नाव आहे. गणेश शिंदे यांनी या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात अपहरणकर्त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नगरसेवक लक्ष्मण ऊंडे, विकास डोळस, कुलदीप परांडे यांनी नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.

विकास डोळस यांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद सोमवारी रात्री खासगी शिकवणीवरुन विजयनगर येथील आपल्या घरी जात होता. दिघी जकात नाक्याजवळ आला असता त्याला एका 20-22 वर्षीय महिलेने हटकले. ती म्हणाली, "मी तुझ्या मम्मीची मैत्रीण आहे. तुझ्या मम्मीचा अॅक्सीडेंट झालाय. मला तुला घ्यायला पाठवलंय. चल आपण जाऊ". आणि ती प्रसादला घेऊन जाऊ लागली. जकात नाक्याजवळ पुण्याच्या दिशेने थोड्या अंतरावर एक कार उभी होती. कारला संपूर्ण काळ्या काचा होत्या. यावेळी प्रसादने घरी जाऊन बॅग ठेवून येण्याची विचारणा केली. त्यावेळी ती महिला नाही म्हणून ओढू लागली.

प्रसादला या गोष्टीमुळे अधिक संशय जाणवला. त्याने महिलेच्या हाताला जोराचा झटका दिला आणि जोरात धावत घरी आला. जकात नाक्यापासून त्याचे घर सुमारे 500 मीटर अंतरावर आहे. घरी येऊन बघितले तर त्याची आई चांगली होती. प्रसादने थरथरत्या अंगाने आईला मिठी मारली आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. गणेश यांचे शेजारी पवन खोत यांनी नगरसेवक लक्ष्मण ऊंडे आणि विकास डोळस यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी शिंदे यांच्या घरी भेट दिली आणि तात्काळ दिघी पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. पालकांनी प्रसादला अशा गोष्टींची यापूर्वीच कल्पना दिली होती. तसेच त्यातून सुटका कशी करून घ्यायची, याबाबतही सांगितले होते. त्यामुळेच प्रसादने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली.

नगरसेवक लक्ष्मण उंडे म्हणाले, "सर्व पालकांनी आपल्या मुलांना अशा गोष्टींबाबत सांगायला हवे. अशा प्रसंगांना निडरपणे कसे सामोरे जायचे याबाबत देखील मुलांना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम करायला हवे. अज्ञात व्यक्तींनी दिलेली वस्तू अथवा खाद्यपदार्थ न खाण्याबाबत सांगावे. मुले लहान असतील तर त्यांना सोडायला आणायला जायला हवे"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.