Chinchwad : ग्रेडसेपरेटरमधील गटारी तुंबल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला काल (गुरुवारी) पावसाने चांगलेच झोडपले. शहरातील विविध भागात घरात पाणी शिरल्याच्या, रस्त्याला नदीचे स्वरूप आल्याच्या घटना घडल्या. चिंचवड येथील ग्रेडसेप्रेटर मध्ये पाणी साचल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप मिळाले होते. ग्रेडसेपरेटरमधील गटारी तुंबल्याने पाऊस पडून 12 तास उलटले तरी देखील हा तलाव आटण्याचे नाव घेत नाही. महापालिकेचे कर्मचारी पाणी काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मोठ्या कसरतीने कर्मचा-यांनी साचलेले पाणी काढले आहे. पाणी काढले असले तरी कचरा मात्र अजूनही तसाच पडलेला आहे.

चिंचवड येथील ग्रेड सेपरेटरमधील गटारी बंद झाल्या आहेत. त्यातून पाणी वाहत नाही. काल जोरदार पाऊस बरसल्याने ग्रेड सेपरेटरमधील रस्त्यावर तलावाप्रमाणे पाणी साचले होते. पाऊस पडून 12 तासांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला, तरी देखील हे पाणी जिरले नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी गटारी आणि नाल्यांची स्वच्छता केल्याचा महापालिकेचा दावा पूर्णतः फोल ठरला आहे. पहिल्याच पावसात महापालिकेने कितपत स्वच्छता केली, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. गुरुवारी सुमारे दोन ते तीन तास मुसळधार पाऊस कोसळत होता. या पावसात शहरातील सर्वच रस्त्यावर आणि चौकात पाणी साचून नद्याचे स्वरूप आले होते. काही भागात धबधब्याप्रमाणे वेगात पाणी वाहत होते. त्यामुळे पाण्यातून वाहन काढण्यासाठी चालकांना कसरत करावी लागत होती.

काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, पिंपरीगाव, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव, वाकड, वल्लभनगर या परिसरातील घरामध्ये पाणी शिरले होते. तर, चिंचवड गांधीपेठ येथे वारंवार डांबर टाकल्याने रस्ते उंच झाले आहेत. तर, घरे खाली गेली आहेत. त्यामुळे गांधीपेठेतील अनेक घरात पाणी शिरले होते. यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी ठिकठिकाणी जाऊन पाईपच्या सहाय्याने घरातील पाणी बाहेर काढले. चिंचवड स्टेशन येथील ग्रेडसेपरटरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मुबंई-पुणे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ संथगतीने सुरु होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.