Pune : अणुबॉम्बपेक्षा स्फोटक असलेली विषमता दूर करणे हे मोठे आव्हान – डॉ. बाबा आढाव

लोकनेते भाई वैद्य स्मृती पुरस्कार समाजवादी कार्यकर्त्या वर्षाताई गुप्ते यांना प्रदान

एमपीसी न्यूज – समाजातील यच्चयावत माणसांना प्रगतीचा मार्ग खुला करून देणे म्हणजे समाजवाद. समानता हे समाजवादाचे मुख्य सूत्र असून अणुबॉम्बपेक्षा स्फोटक असलेली विषमता दूर करणे हे मोठे आव्हान आहे, असे मत कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांनी व्यक्त केले.

ज्ञान फाऊंडेशनतर्फे ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या स्मरणार्थ पहिला लोकनेते भाई वैद्य स्मृती कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी नेत्या वर्षाताई गुप्ते यांना आढाव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी आढाव बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कष्टक-यांचे नेत बाबा आढाव आणि आरोग्य सेनेचे अध्यक्ष डाॅ.अभिजीत वैद्य, ज्ञान फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते, सचिन शिंदे आणि अर्चना मुंद्रा उपस्थित होते. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि शाल असे या पुरस्कारांचे स्वरुप होते.

यावेळी बोलताना बाबा आढाव म्हणाले, " आर्थिक, सामाजिक अशा सगळ्याच क्षेत्रातील विषमता मानवी जीवन पोखरत असून ही विषमता दूर करण्यासाठी तळागाळापर्यंत जाऊन अधिक काम करण्याची गरज आहे. शोषणाची जाणीव ही शोषणाविरूद्ध लढण्याची पहिली पायरी असते. समाजाची प्रगती ही त्या समाजातील चिंतनशीलता आणि कलात्मक सृजनशीलता यांच्यातून प्रतीत होत असते. भारतीय विचार देशवासीयांच्या मनाच्या तळापर्यंत झिरपवत नेणे गरजेचे आहे. चळवळींमध्ये कार्य करणाऱ्यांनी सतत आत्मपरिक्षण करून आपण नेमके कुठे कमी पडलो, याचाही विचार केला पाहिजे.

यावेळी बोलताना डाॅ. अभिजीत वैद्य म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत धर्मनिरपेक्षता, जातीअंताचे स्वप्न, सार्वभौमत्व आणि मुख्य म्हणजे भारतीय संस्कृती धोक्यात आली आहे. नक्षलवाद्यांचे शिक्के मारून पुरोगाम्यांना डांबण्याचे षडयंत्र देशाच्या भविष्याच्या दृष्टीने खूपच घातक आहे. प्रशासकीय यंत्रणा भेदून टाकण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असून त्यादृष्टीने सुरू असलेली वाटचाल फारच दुर्दैवी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.