Nigdi : रुग्णालयात उपचार घेणाऱ्या तरुणाला ठार मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – रस्त्याने जात असलेल्या तरुणाला गाठून मारहाण करण्यात आली. या घटनेत गंभीर जखमी झालेला तरुण पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचार घेत असताना आरोपींनी रुग्णालयात जाऊन ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार रुपीनगर तळवडे, निगडी मधील सोमेश्वर मंदिरासमोर आणि वायसीएम रुग्णालयात घडला.

_MPC_DIR_MPU_II

गणेश अडसुळे (वय 19, रा. रुपीनगर, तळवडे) याने याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास चौधरी, अदनान सय्यद, फैय्याज शेख (तिघे रा. ओटा स्कीम, निगडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश याचा मावस भाऊ वैभव गायकवाड (वय 14) याला विकास याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने ‘त्या मुलीसोबत फिरत जाऊ नको’ असे म्हणून शनिवारी (दि. 18) रात्री साडेआठच्या सुमारास मारहाण केली. त्यानंतर गणेश मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. भांडणानंतर गणेश त्याच्या मावस भावाला सोडून जात असताना निगडी मधील सोमेश्वर मंदिरासमोर एकट्याला गाठून पुन्हा मारहाण केली. अदनान सय्यद याने लोखंडी चाकूने गणेश याच्या पाठीवर वार केले. यामध्ये गणेश गंभीर जखमी झाला. त्याला वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आरोपींनी रुग्णालयात जाऊन गणेशला ठार मारण्याची धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.