Malavali : भारत विकास परिषदेतर्फे नैसर्गिक शिक्षण संस्थेत वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – भारत विकास परिषद, पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने मळवली मधील नैसर्गिक शिक्षण संस्थेत वृक्षारोपण करण्यात आले. नैसर्गिक शिक्षण संस्थेच्या आवारात जांभूळ, पिंपळ, करंज, वड, आंबा आणि काही जंगली वनस्पतींची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला भारत विकास परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेचे सभासद सहकुटुंब उपस्थित होते. तसेच निगडी प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेतील गुरुकुल विभागाच्या विद्यार्थ्यांनी देखील या उपक्रमात सहभाग नोंदवला.

मळवली येथील नैसर्गिक शिक्षण संस्था 2007 पासून रस्त्यावरील मुलांसाठी काम करीत आहे. सतीश मून व योगिता मून या दांपत्याने सुरू केलेल्या या संस्थेत आज 102 मुले व 60 मुली राहत आहेत. स्वतः अनाथालयात वाढलेल्या मून दांपत्याने विवाहानंतर स्वतःला या कार्यात वाहून घेतले आहे. भारत विकास परिषदेच्या देशभरात सुमारे 1500 शाखा असून संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण या पंचसूत्रीवर आधारित अनेक कार्य परिषदेतर्फे करण्यात येत आहेत. 2015 सालापासून भारत विकास परिषदेची पिंपरी चिंचवड शाखा नैसर्गिक शिक्षण संस्थेबरोबर निसर्ग संवर्धनाचे काम करत आहे. शाखेतर्फे अनाथ मुलांसाठी एक मूठ धान्य हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या संकल्पनेतून संस्थेला दरमहा सुमारे 500 किलो धान्य पुरवण्यात येते.

पावसाळ्यात वृक्षारोपण केल्यास पावसाळा संपेपर्यंत रोपांमध्ये चांगल्या प्रकारे उगवण क्षमता निर्माण होते. त्यामुळे पावसाळा सुरु होताच वृक्षारोपण करण्यात आले. भारत विकास परिषदेविषयी अजय लोखंडे यांनी माहिती दिली. शिक्षण ग्राम विषयी योगिता मून यांनी माहिती दिली. अनुराग हिंगे यांनी ज्ञानप्रबोधिनी विषयी माहिती दिली. समीर हिर्लेकर यांनी प्रास्ताविक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.