Lonavala : कंटेनरवर दरोडा टाकून दोन कोटींचा माल लुटणा-या टोळीवर मोक्काची कारवाई

एमपीसी न्यूज – टोबॅको कंपनीचा माल घेऊन जाणा-या कंटेनरला  जुना पुणे हायवे वाकसाई गावाजवळ एका टोळीने अडवून चालकाला मारहाण करत तब्बल दोन कोटी, दोन लाख, 63 हजार, 317 रुपयांचा दरोडा टाकला होता. त्यातील सर्व आरोपींना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 

शाहरुख रज्जाक शेख, शाहेद खान जाहेदखान पठाण, इब्राम रुस्तुम शेख, विकास जालिंदर मुळे, फारुख दिलावर पिंजारी, सुलतान अयुब पठाण, तन्वीर मोहम्मद हनीफ रंगरेज, संदीप उर्फ खुकार विजय वाघमारे, बंटी उर्फ सागर सोना पगारे, महंमद मौलाना, पटयार उर्फ विजय लक्ष्मण इस्टे, विवेक बाळासाहेब परदेशी (सर्व रा. कोपरगाव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीने संघटित गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम सन १९९९ कायद्यान्वये त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 

कमाल अहमदशमी खान (वय 41, रा. धारावी, मुंबई) हा 08 सप्टेंबर, 2017 रोजी एम एच 12, एच डी 6008 या कंटेनरमध्ये आयटीसी टोबॅको कंपनीचा माल घेऊन रांजणगाव एमआयडीसी कडे जात होता. कंटेनरमध्ये एकूण 865 सिगारेटचे कार्टून होते. कंटेनर जुना पुणे मुंबई महामार्गावर वाकसाई गावाजवळ अरुणोदय ढाब्याजवळ आला असता वरील आरोपींनी स्कार्पिओ मध्ये येऊन कंटेनर चालक कमाल खान याला मारहाण केली. यामध्ये चालकाच्या खिशातून जबरदस्तीने मोबाईल फोन काढून घेतला. एकूण दोन कोटी, दोन लाख, 63 लाख, 317 रुपयांचा ऐवज घेऊन नाशिकच्या दिशेने चोरांनी पलायन केले. 

सर्व गुन्हेगारांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे यांच्याकडे पाठविण्यात आला. वरील आरोपींविरोध खून, दरोडे, खुनाचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, आर्म अॅक्ट, गर्दी मारामारी, पळवून नेणे अशा प्रकारचे गुन्हे शिर्डी, लोणी, श्रीरामपूर, कोपरगाव, नारायणगाव, खान्देश पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यामुळे यांच्याविरोधात अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांनी मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची परवानगी दिली असून शिवाजीनगर पुणे विशेष न्यायालयात त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहेतही कारवाई पोलीस अधीक्षक सुवेज हक, अपर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवथरे, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, तपासी अधिकारी साधना पाटील आदींनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.